भीमा पात्रातील मृतदेह घटना; पवार कुटुंबाने निघोजमधून हलवला होता मुक्काम 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 12:40 AM2023-01-25T00:40:59+5:302023-01-25T00:42:09+5:30

मोहन पवार यांचे कुटुंब निघोज येथे कुंड रस्त्यावर पाल टाकून राहात होते.

Dead bodies incident in Bhima The Pawar family had shifted their residence from Nighoj | भीमा पात्रातील मृतदेह घटना; पवार कुटुंबाने निघोजमधून हलवला होता मुक्काम 

प्रतिकात्मक फोटो

निघोज (अहमदनगर) - मोहन पवार यांच्या कुटुंबाने पारनेर तालुक्यातील निघोज येथून पाच दिवसांपूर्वी आपला मुक्काम हलवला होता. मंगळवारी त्यांचे मृतदेह सापडल्याची बातमी आल्याने निघोज परिसर हादरला आहे.

मोहन पवार यांचे कुटुंब निघोज येथे कुंड रस्त्यावर पाल टाकून राहात होते. त्यांची मोठी मुलगी व जावई हेही शेजारील पालात राहत होते. पवार हे मूळचे बीड जिल्ह्यातील खामगाव (ता. गेवराई) येथील असून, जावई उस्मानाबाद जिल्ह्यातील हातोला (ता. वाशी) येथील आहेत. दोन वर्षांपासून ते निघोज येथे राहून पाइपलाइन खोदाईचे काम करीत होते.

१७ जानेवारीला रात्री पवार यांनी पत्नी, शेजारी राहणारे जावई, मुलगी, तीन नातवंडे यांना घेऊन निघोज सोडले होते. आपले पालही त्यांनी उचलून नेले होते. पवार यांच्यापासून काही अंतरावर राहणाऱ्या नागरिकांसोबत ‘लोकमत’ने चर्चा केली असता ते भेदरलेल्या अवस्थेत होते. कुणालाच काही तपशील सांगता येत नाही.

पवार यांच्या मुलाविरोधात आहे तक्रार -
निघोज येथील एक महिला बेपत्ता असल्याची तक्रार पारनेर पोलिस स्टेशनला देण्यात आली आहे. १७ जानेवारी रोजी ती घरातून निघून गेली आहे. मोहन पवार यांचा मुलगा अनिल हाही त्या दिवसापासून बेपत्ता आहे. अनिलने आपल्या मुलीला पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी पारनेर पोलिस स्टेशनला दिली आहे. पवार कुटुंब पाल खाली करून गेल्याचेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. अनिल व सदर मुलगी हे दोघेही एकाच समाजाचे आहेत. पवार यांनी या घटनेच्या भीतीमुळे निघोज सोडल्याची चर्चा आहे. आत्महत्येशी या घटनेचा संबंध आहे का? याबाबतही पोलिस तपास करत आहेत.
 

Web Title: Dead bodies incident in Bhima The Pawar family had shifted their residence from Nighoj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.