जिल्हा कारागृहातील आरोपीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 02:40 PM2018-10-05T14:40:29+5:302018-10-05T14:40:32+5:30
फसवणुकीच्या गुन्ह्यात जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीचा गुरूवारी मृत्यू झाला
अहमदनगर: फसवणुकीच्या गुन्ह्यात जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीचा गुरूवारी मृत्यू झाला. परंतु पोलिसांमधील हद्दीचा वाद, प्रशासनाची ढिलाई यामुळे मृतदेहाचा पंचनामा होण्यासाठी तब्बल १० तास लागले. त्यामुळे मृताच्या नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
सोमनाथ आसाराम ठोंबे (वय ३३, रा. कौडगाव, ता. नगर) असे मृताचे नाव आहे. ठोंबे याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल असल्याने तो गेल्या दोन महिन्यांपासून अहमदनगर जिल्हा कारागृहात दाखल झाला होता. गुरूवारी सकाळी अचानक त्याच्या छातीत दुखायला लागल्यामुळे कारागृह पोलिसांनी त्याला सकाळी साडेआठ वाजता जिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास त्याचे जिल्हा रुग्णालयात निधन झाले. जिल्हा कारागृह कोतवाली पोलिसांच्या हद्दीत व जिल्हा रूग्णालय तोफखाना पोलिसांच्या हद्दीत असल्यामुळे या मृत्यूप्रकरणी गुन्हा कोठे दाखल करायचा यावर पोलिसांचे मंथन सुरू झाले. कारागृहात असताना आरोपीचा मृत्यू झाल्याने पुढील कायदेशीर क्लिष्टतेचे झेंगट नको त्यामुळे पोलीस हात झटकत होते, तर दुसरीकडे पंचनामा होत नसल्याने नातेवाईट ताटकळत बसले. अखेर सायंकाळी कोतवाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. कोतवालीकडे चौकशी केली असता दुपारी ३.५६ वाजता नोंद केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दुसरीकडे तहसीलदारांच्या उपस्थितीत पंचनाम्याची प्रक्रिया रात्री पावणेनऊ वाजेपर्यंत सुरू होती. कारागृहात असताना आरोपीचा मृत्यू झाल्याने शवविच्छेदन कोठे होणार याबाबत नगरचे तहसीलदार अप्पासाहेब शिंदे यांच्याकडे रात्री पावणेनऊ वाजता विचारणा केली असता, पंचनामा सुरू असून पुढील निर्णय झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. म्हणजे सकाळी अकरा वाजता झालेल्या मृत्यूचा पंचनामा रात्री नऊवाजेपर्यंत सुरू होता.