पांगरमल दारूकांडातील आरोपी मोहन दुग्गल याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 12:53 PM2018-03-25T12:53:44+5:302018-03-25T12:54:08+5:30
नगर तालुक्यातील पांगरमल दारूकांड प्रकरणातील आरोपी मोहन श्रीराम दुग्गल (वय ६४) यांचा शनिवारी नाशिक येथे रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुग्गल हा नाशिक येथील कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता.
अहमदनगर : नगर तालुक्यातील पांगरमल दारूकांड प्रकरणातील आरोपी मोहन श्रीराम दुग्गल (वय ६४) यांचा शनिवारी नाशिक येथे रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुग्गल हा नाशिक येथील कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता.
तब्बल अकरा जणांचा बळी घेणाऱ्या पांगरमल दारूकांड प्रकरणात १९ जणांवर मोक्कातंर्गत कारवाई झालेली आहे. या प्रकरणी नाशिक येथील विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून, याची सुनावणी सुरू आहे. पांगरमल येथे १२ फेब्रुवारी २०१७ रोजी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीदरम्यान कार्यकर्त्यांसाठी राजकीय नेत्यांनी दिलेल्या पार्टीत विषारी दारू पिऊन अकरा जणांचा मृत्यू झाला होता. ही विषारी दारू नगर शहरातील जिल्हा रूग्णालयातील कॅन्टीनमध्ये बनविण्यात येत होती़ या प्रकरणी पोलीसांनी बनावट दारू बनविणा-या मोहन दुग्गलसह, जाकीर शेख, जितू गंभीर, सोनू दुग्गल, हमीद शेख, भरत जोशी यांना अटक केली होती. मुख्य आरोपींना अटक केल्यानंतर बनावट दारू बनविणाºयांचे रॅकेट समोर येऊन या प्रकरणात तब्बल १९ जणांवर गुन्हा दाखल झाला. या प्रकरणातील आरोपींवर मोक्कातंर्गतकारवाई झाल्यानंतर त्यांना नाशिक कारागृहात हलविण्यात आले. मोहन दुग्गल हा गेल्या काही दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत होता. तो अजारी पडल्याने त्याला उपचारासाठी मुंबई येथे दाखल करण्यात आले होते. त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. शुक्रवारी रात्री त्याला त्रास होऊ लागल्याने त्याला नाशिक येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
घटनेतील दोघांचा मृत्यू
पांगरमल दांरूकांड प्रकरणातील आरोपी राजू बुगे याचा २२ मार्च २०१७ रोजी ओतूरजवळील (जि़ पुणे) सुंबरवाडी फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला होता. या घटनेतील १९ पैकी दोन आरोपींचा मृत्यू झाला आहे.