लहान भावाच्या मृत्यूच्या धक्क्याने मोठ्या भावाचाही मृत्यू, अहमदनगरमधील हृदयद्रावक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 06:33 PM2018-12-04T18:33:32+5:302018-12-04T18:48:28+5:30
नगरमध्ये शिक्षण घेत असलेल्या भावाच्या मृत्यूची बातमी ऐकून घरी असलेल्या भावाचाही मृत्यू झाला.
भेंडा : नगरमध्ये शिक्षण घेत असलेल्या भावाच्या मृत्यूची बातमी ऐकून घरी असलेल्या भावाचाही मृत्यू झाला. सचिन चावरे (वय 21 वर्षे ) व शुभम चावरे(वय 19 वर्षे ) या दोन सख्ख्या भावांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना नेवासा तालुक्यातील नजीक चिंचोली या गावी घडल्याने चिंचोली गावावर शोककळा पसरली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नेवासा तालुक्यातील नजीक चिंचोली येथील शेतकरी पोपट सीताराम चावरे(वय 50 वर्षे) यांचा लहान मुलगा शुभम हा नगर येथे एमबीएचे शिक्षण घेत होता. मंगळवार दि.4 डिसेंबर रोजी सकाळी 5 वाजता कॉलेजमध्ये गेला असता पायऱ्या चढतांनी तो पाठीमागे पडला. त्याला तातडीने नगर सिव्हिल हिस्पिटल मध्ये उपचारासाठी नेण्यात आले परंतु उपचाराआधीच त्याचे निधन झाल्याचे घोषित करण्यात आले.
शुभमच्या मृत्यूची बातमी नजीक चिंचोली येथे घरी असलेल्या शुभमच्या मोठा भाऊ सचिन याला समजली. शुभमच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने सचिनची प्रकृती बिघडल्याने त्याला दुपारी 2 वाजता प्रथम भेंडा व त्यांनतर नेवासा फाटा येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु सचिनचे ही उपचारापूर्वीच निधन झाले.
नगर येथील सिव्हिल हॉस्पिटल मध्ये शुभमचे शवविच्छेदन तर नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात सचिनचे शवविच्छेदन केल्या नंतर दोघा भावांचे मृतदेह नजीक चिंचोली येथे आणण्यात आले. सायंकाळी 5 वाजता शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
एकाच कुटुंबातील आणि सख्ख्या भावांचे असे निधन होणे ही अत्यंत हृदयद्रावक घटना आहे.या घटनेने नजीक चिंचोली गावावर शोककळा पसरली आहे. सचिन,शुभम,आई-वडील व दोन बहिणी असा हा परिवार होता .त्यांचे मागे आता आई-वडील,एक विवाहित व एक लहान बहीण असा परिवार आहे.