मुळा नदीपात्रात धुणे धुण्यासाठी गेलेल्या विद्यार्थिनीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 04:37 PM2017-10-16T16:37:05+5:302017-10-16T16:40:37+5:30
राहुरी : मुळा नदीपात्रात आईबरोबर धुणे धुण्यासाठी गेलेल्या इयत्ता नववीच्या विद्यार्थिनीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज घडली. राहुरी रेल्वे ...
राहुरी : मुळा नदीपात्रात आईबरोबर धुणे धुण्यासाठी गेलेल्या इयत्ता नववीच्या विद्यार्थिनीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज घडली. राहुरी रेल्वे स्टेशन परिसरात ही घटना घडली असून भारती ज्ञानेश्वर हिवराळ असे मयत विद्यार्थिनीचे नाव आहे.
भारती (वय १४) ही प्रसाद विद्यालयाची विद्यार्थिनी असून शाळेला सुट्टी असल्यामुळे ती आईबरोबर नदीवर गेली होती. धुणे धुत असताना भारतीचा पाय घसरल्याने ती नदीपात्रात पडली़ तिला पोहता येत नसल्यामुळे ती पाण्यात बुडू लागली. तिच्या आईने आरडाओरड केली. त्यानंतर आजुबाजुचे नागरीक मदतीसाठी धावून आले. नागरिकांनी भारतीला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र नदीला मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे भारतीला पाण्याबाहेर काढण्यात नागरिकांना अपयश आले.
घटनेची माहिती मिळताच राहुरी नगर परिषदेचे अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. राहुरी स्टेशन येथील राजु निकम यांनी भारतीचा शोध घेतला़ एका वाळूच्या खड्ड्यातून भारतीचा मृतदेह बाहेर काढण्यात आले. उपचारासाठी राहुरी येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच तिचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिका-यांनी सांंगितले. राहुरी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.