आदिवासीच्या मृत्यूप्रकरणी नगरचे पोलीस अधीक्षक, पालकमंत्र्यांच्या कार्यालयावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 04:08 PM2018-09-17T16:08:35+5:302018-09-17T16:09:16+5:30
आदिवासी समाजाच्या शेतक-याच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी व्हावी, तसेच आरोपींना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी आदिवासी समाजाने जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच पालकमंत्री राम शिंदे यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला.
अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील कळसपिंप्री येथील शासकीय जमिनीत शेती करुन उपजिविका करणाऱ्या आदिवासी समाजाच्या शेतक-याच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी व्हावी, तसेच आरोपींना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी आदिवासी समाजाने जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच पालकमंत्री राम शिंदे यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला.
पालकमंत्री शिंदे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, कळसपिंप्री येथे सुमारे २५ कुटुंब आदिवासी समाजातील आहेत़ या कुटुंबातील मयत कंस लक्ष्मण पवार हे शासकीय जमिनीत शेती करीत होते. त्यांमुळे गावातील काही गुंडांनी त्यांची राहती घरे जाळून बेदम मारहाण केली़ मयत पवार यांचा मृत्यूही गावातील गुंड लोकांनीच घडवून आणला आहे. सदर घटना ही मॉब लिचिंग प्रकारात मोडत असून, आरोपींना कडक शिक्षा व्हावी, ज्येष्ठ विधिज्ज्ञ अॅड. उज्ज्वल निकम यांची या खटल्यात सरकारी वकील म्हणून नियुक्ती व्हावी अशा विविध मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.