बाभूळवंडीत आगीत दोन वासरांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 02:40 PM2019-01-23T14:40:01+5:302019-01-23T14:40:45+5:30
अकोले तालुक्यातील बाभूळवंडी येथील बांगर वस्तीवरील पांडू शिवा बांगर या आदिवासी शेतकऱ्याच्या घरास सोमवारी मध्यरात्रीनंतर अचानक लागलेल्या आगीत संसारोपयोगी साहित्यासह एक म्हशीचे पारडू व एका वासराचा होरपळून मृत्यू झाला.
राजूर : अकोले तालुक्यातील बाभूळवंडी येथील बांगर वस्तीवरील पांडू शिवा बांगर या आदिवासी शेतकऱ्याच्या घरास सोमवारी मध्यरात्रीनंतर अचानक लागलेल्या आगीत संसारोपयोगी साहित्यासह एक म्हशीचे पारडू व एका वासराचा होरपळून मृत्यू झाला. तर दोन बैल जखमी झाले. घटनेत सहा लाखाचे नुकसान झाले आहे
बाभूळवंडी गावालगत असणाºया बांगरवाडी येथे सहा, सात लोकांची वस्ती आहे. येथील पांडू बांगर यांच्या कौलारू घरास सोमवारी मध्यरात्रीनंतर अचानक आग लागली. हे लक्षात येताच या कुटुंबाची धावपळ उडाली. घरालगत असणाºया गोठ्यातील जनावरे सोडण्यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले. मात्र यात एक पारडू आणि वासरू सोडण्यास त्यांना अपयश आले. यात हे दोन्हीही लहान जनावरे मृत्यूमुखी पडली.
या जनावरांबरोबर घरातील अन्न धान्य, कपडे, मुलांचे शैक्षणिक साहित्य व इतर सर्व वस्तू जळून खाक झाले. त्यामुळे हे सर्व कुटुंब उघड्यावर पडले आहे. रात्रीची वेळ असल्याने आग विझवता आली नाही. त्यामुळे हातात काहीच शिल्लक राहिले नाही.घटनेची माहिती मिळाल्यानंतर कामगार तलाठी सचिन मांढरे, सरपंच, पोलीस पाटील यांनी केलेल्या प्राथमिक पंचनाम्यानुसार सुमारे सहा लाख रुपयांचे नुकसान झाले. सदर पंचनामा पुढील कार्यवाहीसाठी तहसीलदार यांना सुपूर्द केला असल्याचे मांढरे यांनी सांगितले. या धावपळीत पांडू बांगर भाजले असून ते येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत.