शिर्डी येथे दर्शनबारीत दोन साई भक्ताचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 06:54 PM2017-12-25T18:54:44+5:302017-12-25T18:55:16+5:30
साईदर्शनासाठी आलेल्या एका भाविकाचा सोमवारी दुपारी मध्यान्ह आरतीनंतर दर्शनबारीत मृत्यू झाला़ दुपारी एकच्या सुमारास अपंगाच्या रांगेत ही दुर्दैवी घटना घडली. रविवारीही एका भाविकाचा भक्त निवासात मृत्यू झाला. हा भाविक जागतिक साईमंदीर विश्वस्त परिषदेत सहभागी होण्यासाठी आलेला होता.
शिर्डी : साईदर्शनासाठी आलेल्या एका भाविकाचा सोमवारी दुपारी मध्यान्ह आरतीनंतर दर्शनबारीत मृत्यू झाला़ दुपारी एकच्या सुमारास अपंगाच्या रांगेत ही दुर्दैवी घटना घडली. रविवारीही एका भाविकाचा भक्त निवासात मृत्यू झाला. हा भाविक जागतिक साईमंदीर विश्वस्त परिषदेत सहभागी होण्यासाठी आलेला होता.
थल्लूरी केशवराव भद्रय्या (वय ५५) असे दर्शनबारीत मृत्यूमुखी पडलेल्या भाविकांचे नाव आहे. ते खम्माम (तेलंगणा) येथील रहिवासी आहेत. आपल्या कुटूंबासह ते शिर्डीला आले होते. दुपारी अकराच्या सुमारास कुटुंबासह ते मंदिर परिसरात आले होते. ते अपंग असल्याचे कुटूंबातील लोकांनी सांगितले. त्यांना टाईम दर्शन पास काढून आणण्यास सांगण्यात आले. ते पुन्हा रांगेकडे येऊन पास घेऊन मंदिराकडे आले़ तेथे अपंग गेटच्या जवळच त्यांना त्रास जाणवू लागल्याने ते खाली बसले. तेथून त्यांना तातडीने संस्थानच्या मंदीर परिसरातील प्रथोमपचार कक्षात व नंतर साईबाबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांना रक्तदाब व मधुमेहाचा त्रास होता. त्यांना अधुनमधून झटकेही येत होते, असे त्यांचा मुलगा भरतकुमार व नातू राजू यांनी सांगितले.
दरम्यान शनिवारच्या जागतिक साई मंदिर विश्वस्त परिषदेसाठी आलेले भाविक के. एम. प्रकाश यांचा रविवारी सकाळी साईबाबा संस्थानच्या साई आश्रम एक या धर्मशाळेत मृत्यू झाला होता. ते आय ब्लॉकमधील रूम नंबर अकरामध्ये राहत होते. रविवारी सकाळी सव्वा आठच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. ते दावणगिरी (कर्नाटक) येथील रहिवाशी होते.