स्वाईन फ्ल्यूने महिलेचा मृत्यू
By Admin | Published: September 10, 2014 11:19 PM2014-09-10T23:19:56+5:302023-10-10T17:42:38+5:30
बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील दहिगाव-शे येथील लता कचरू दुबे (वय ४२) या महिलेचा स्वाईन फ्ल्यू या संसर्गजन्य आजाराची लागण होवून मृत्यू झाला़
बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील दहिगाव-शे येथील लता कचरू दुबे (वय ४२) या महिलेचा स्वाईन फ्ल्यू या संसर्गजन्य आजाराची लागण होवून मृत्यू झाला़ दुबे यांच्यावर औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते़ मात्र, उपचार सुरू असताना मंगळवारी (दि़९) त्यांचा मृत्यू झाला़ स्वाईन फ्ल्यूने महिलेचा मृत्यू झाल्याने दहिगाव-शे परिसरात घबराट पसरली आहे़ आरोग्य विभाग मात्र, अद्यापही झोपेतच आहे़
दहिगाव-शे येथील लता दुबे यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्यावर त्यांना प्रथम चापडगाव व नंतर शेवगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले़ मात्र, आजाराचे निदान न झाल्याने त्यांची प्रकृती खालावली़ त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील खासगी रुग्णाालयात दाखल करण्यात आले़ दुबे यांच्या रक्ताचे नमुने मुंबई येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले़ त्यामध्ये दुबे यांना स्वाईन फ्ल्यूची लागण झाली असल्याचे निदर्शनास आले़ उपचार सुरू असतानाच त्यांचा मंगळवारी मृत्यू झाला़ महिलेच्या मृत्यूनंतर दहिगाव-शे येथील माजी सरपंच रमेश भापकर यांनी औरंगाबाद रुग्णालयातील अहवाल पंचायत समितीच्या आरोग्य विभागाला सादर केला़ मात्र, गावातील उपाययोजनांबाबत आरोग्य विभागाने काहीच दखल घेतली नाही़ त्यामुळे ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे़
(वार्ताहर)
दहिगाव-शे येथील लता दुबे यांच्या मृत्युचा अहवाल कार्यालयास प्राप्त झाला आहे़ दहिगाव-शे परिसरात स्वाईन फ्ल्यू या संसर्गजन्य आजाराची लागण होवू नये, यासाठी तातडीने दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत़
-डॉ़ चंद्रकांत परदेशी, प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी