जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पेटवून घेतलेल्या युवकाचा अखेर मृत्यू : आज कर्जत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 10:13 AM2018-12-21T10:13:46+5:302018-12-21T10:18:43+5:30
कर्जत येथील दावल मालिक देवस्थान ट्रस्टच्या भूखंडावरील अनधिकृत बांधकामे हटविण्याच्या
अहमदनगर : कर्जत येथील दावल मालिक देवस्थान ट्रस्टच्या भूखंडावरील अनधिकृत बांधकामे हटविण्याच्या मागणीसाठी काल (गुरुवारी ) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून स्वत:ला पेटवून घेणा-या तौसिफ हमीम शेख यांचा गुरुवारी रात्री उपचारादरम्यान पुण्यातील ससून रुग्णालयात मृत्यू झाला.
कर्जत शहरातील पीर दावल मलिक या देवस्थान ट्रस्टच्या भूखंडावरील अतिक्रमणे हटविली जावीत या मागणीसाठी तौसिफ हमीम शेख यांनी काल दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वत:ला पेटवून घेतले होते. शेख हे ८० टक्के भाजल्याने त्यांना प्रथम नगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना तातडीने ससून रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र गुरुवारी मध्यरात्रीच प्रकृती गंभीर झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
घटनेचे कर्जत मध्ये पडसाद
तोसिफ शेख यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने कर्जत मध्ये आज सकाळपासूनच कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. शहरात विविध ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुस्लिम संघटनानी बंदची हाक दिली आहे.