मुंबईतील बँकेच्या शाखाधिकाऱ्याकडून कर्जदाराची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:21 AM2021-08-01T04:21:09+5:302021-08-01T04:21:09+5:30
पंढरीनाथ तराळ (बँक व्यवस्थापक, रा. ऐरोली, नवी मुंबई), ज्ञानदेव सुराजी मते (अधिकृत अधिकारी, रा. ठाणे), अशी गुन्हा दाखल झालेल्या ...
पंढरीनाथ तराळ (बँक व्यवस्थापक, रा. ऐरोली, नवी मुंबई), ज्ञानदेव सुराजी मते (अधिकृत अधिकारी, रा. ठाणे), अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात नितीन अंबादास पिसे (उद्योजक, रा. वाशी, नवी मुंबई) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिसे यांचा कागदी पिशव्या बनविण्याचा उद्योग आहे. त्यांनी उत्पादन वृद्धीसाठी नवीन युनिट घेण्याकरिता बँकेच्या तुर्भे (मुंबई) शाखेकडे कर्जाची मागणी केली होती. दोन वेगवेगळ्या खात्यांत प्रत्येकी सहा लाख याप्रमाणे बारा लाख रुपयांची रक्कम बँकेकडून त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली. मात्र, पिसे यांना खात्यात जमा झालेली कर्जाची रक्कम तांत्रिक कारणांनी काढता येत नव्हती. दरम्यान, पिसे यांना बँकेचा व्यवस्थापक तराळ याने कर्जाच्या थकबाकीपोटी बँकेने जप्त केलेल्या संगमनेरातील कागदी बॉक्स बनविणाऱ्या एका कारखान्याची माहिती दिली. सदर कारखाना चालविण्यास घ्या, असे त्याने पिसे यांना सुचविले.
१२ लाखांचे मंजूर झालेले कर्ज मिळत नसल्याने पिसे यांनी ६५ लाखांत कारखाना घेण्याची तयारी दर्शविली. पिसे यांच्या प्रकरणाकरिता अधिकृत अधिकारी म्हणून मते याची नेमणूक करण्यात आली होती. त्याने ९ मार्च २०१६ ला पिसे यांना संगमनेरात बोलावून दुय्यम निबंधकांकडे विक्रीपत्रासह विक्री प्रमाणपत्र व इतर सर्व कागदपत्रे तयार केली. सदरची मिळकत बिनशेती नमूद करण्यात आली होती. सदरच्या मिळकतीचे बँकेच्या नावाने गहाण खतही नोंदवून घेण्यात आले. त्याच दिवशी सायंकाळी संगमनेरातील बॉक्स तयार कारखाना पिसे यांच्या नावावर होऊन त्यांच्या बँक खात्यात कर्जाची रक्कम वर्ग झाली व लागलीच ती बँकेने मिळकतीच्या पोटी वळवून घेतली. यानंतर ऑगस्ट २०१८ पर्यंत पिसे यांनी कारखाना चालविला. मात्र, डिसेंबर २०१८ मध्ये त्यांना संगमनेर तहसील कार्यालयाकडून नोटीस बजावल्याने सदरची जागा अनधिकृत बिनशेती असल्याचे त्यांना समजले. त्यापोटी थकीत महसुलाची मागणी करण्यात आली होती.
पिसे यांनी माहिती अधिकाराचा वापर करून त्या जमिनीबाबतची माहिती मिळविली असता ती जमीन शेतजमीन असतानाही बँकेचा व्यवस्थापक तराळ व अधिकृत अधिकारी मते यांनी जमीन बिनशेती भासवून त्यांची आर्थिक फसवणूक केल्याचे समोर आले. त्यांनी याबाबत बँकेत जाऊन विचारणा केली असता व्यवस्थापक तराळ याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. त्यानंतर पिसे यांनी संगमनेर गाठून ॲड. सुशांत कवडे यांच्याकडून मार्गदर्शन घेत व्यवस्थापक तराळ, अधिकृत अधिकारी मते या दोघांविरोधात फसवणुकीची तक्रार दिली. पोलीस निरीक्षक मुकुंदराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पंकज शिंदे अधिक तपास करीत आहेत.
---------