कर्जमाफी म्हणजे ‘लबाडाघरचं आवतन’ : शरद पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 03:38 PM2017-09-24T15:38:12+5:302017-09-24T15:41:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : मुंबई ते अहमदाबाद या शासनाने सुरू केलेल्या बुलेट ट्रेनचा राज्याला फायदा नसून उलट महाराष्ट्रावर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : मुंबई ते अहमदाबाद या शासनाने सुरू केलेल्या बुलेट ट्रेनचा राज्याला फायदा नसून उलट महाराष्ट्रावर त्या खर्चाचा बोजा पडला आहे. मुख्यमंत्र्यांनी याचा विचार करायला हवा होता. शेतक-यांची कर्जमाफी म्हणजे ‘लबाडाघरचं आवतन आहे, ते जेवल्याशिवाय खरं नाही’, असा टोमणा मारत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी शेलक्या शब्दांत राज्य, तसेच केंद्र शासनावर टीका केली.
कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीनिमित्त नगरला आले असता, पवार यांनी पत्रकारांशी बोलताना शासनावर नेम धरला. मोठा गाजावाजा करून मुंबई ते अहमदाबाद ही बुलेट ट्रेन सुरू करण्यात आली. ट्रेन सुरू करण्यास विरोध नाही. परंतु या बुलेट ट्रेनचा मुंबईसह महाराष्ट्रालाही काहीच फायदा नाही. या प्रकल्पाचा खर्च १ लाख कोटींचा आहे. त्यात महाराष्ट्राच्या वाट्याला ३५ लाख कोटी आले आहेत. अहमदाबादपर्यंत या ट्रेनचे एकूण ११ स्टेशन आहेत, त्यातील केवळ चारच महाराष्ट्राच्या हद्दीत आहेत. उर्वरित स्टेशन गुजरातच्या हद्दीत असल्याने त्याचा जास्त लाभ गुजरातलाच आहे. महाराष्ट्रावर याचा विनाकारण बोजा पडतो आहे, याचा विचार मुख्यमंत्र्यांनी हा प्रकल्प स्वीकारायच्या आधी करायला हवा होता. बुलेट ट्रेन करायचीच होती तर ती मुंबई-दिल्ली अशी करायची होती. मग त्याचा बºयाच राज्यांना फायदा झाला असता. महाराष्ट्रात करायची होती तर चंद्रपूर-पुणे-मुंबई अशी करायची, मग त्याचा राज्याला लाभ झाला असता, असे मुद्दे अधोरेखित करत शरद पवार यांनी बुलेट ट्रेनबाबत मुख्यमंत्र्यांचा निर्णय चुकल्याचे सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी प्रारंभी संपूर्ण कर्जमाफी जाहीर केली. हळूहळू त्यात बदल होत गेले, नंतर तर त्यातील ‘संपूर्ण’ हा शब्दच निघून गेला. त्यामुळे शेतक-यांची कर्जमाफी म्हणजे लबाडाघरचं आवतन आहे, ते जेवल्याशिवाय खरं नाही. आता पाहू कधी जेवायला मिळतंय ते, असा टोमणा पवार यांनी कर्जमाफीच्या मुद्यावर सरकारला मारला.
शिवसेना शेतक-यांसाठी रस्त्यावर उतरायचे म्हणतेय, त्याचे आम्ही स्वागत करतो, परंतु सत्तेत बसून रस्त्यावर उतरता येत नाही, त्यासाठी आधी बाहेर पडा, मग आमच्यासारखे रस्त्यावर या, असे म्हणत पवार यांनी शिवसेनेलाही पट्ट्यात घेतले. यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, अंकुश काकडे, आ. अरूण जगताप, संग्राम जगताप, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले आदी उपस्थित होते.