नागेबाबा पतसंस्थेच्या कर्जदारास १८ महिन्यांची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:37 AM2021-02-18T04:37:27+5:302021-02-18T04:37:27+5:30
भेंडा : कर्जाच्या परतफेडीसाठी संस्थेस दिलेला ५ लाख रुपये रकमेचा धनादेश वटला नाही. यामुळे संत नागेबाबा मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह ...
भेंडा : कर्जाच्या परतफेडीसाठी संस्थेस दिलेला ५ लाख रुपये रकमेचा धनादेश वटला नाही. यामुळे संत नागेबाबा मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटीच्या कर्जदारास १८ महिन्यांची शिक्षा व १० लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश नगर येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी दिला आहे.
अहमदनगर येथील श्री संत नागेबाबा मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी या संस्थेचे कर्जदार राम अनिल ठुबे (रा. नेवासा फाटा) यांनी संस्थेकडून बोअरवेल वाहन खरेदीसाठी १६ लाखांचे कर्ज घेतले होते. कर्जाच्या परतफेडीसाठी त्याने संस्थेस ५ लाखांचा धनादेश दिला होता. धनादेश न वटल्याने संस्थेने निगोशिएबल इन्स्टुमेंट ॲक्टचे कलम १३८ अन्वये आरोपीविरुद्ध संस्थेतर्फे शाखाधिकारी सुनील पोपट पेहरे यांनी खटला दाखल केला होता.
या खटल्यात आरोपीने घेतलेला बचाव न्यायाधीशांनी फेटाळून लावला. कर्जदारास १८ महिन्यांची शिक्षा तसेच १० लाखांची नुकसान भरपाई देण्याचा व ही रक्कम न भरल्यास आणखी ६ महिन्यांची कैद,. असा आदेश दिला. फिर्यादी पतसंस्थेतर्फे विधिज्ञ किशोर राऊत, सौरभ राऊत यांनी काम पाहिले.