मृत समजून वर्षश्राद्ध घातलेला मुलगा तीन वर्षांनी परतला घरी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 10:25 PM2020-02-11T22:25:56+5:302020-02-11T22:26:57+5:30
तरुणाच्या नातेवाईकांचा सोशल मिडीयाच्या माध्यमातून शोध घेतला
अहमदनगर - छत्तीसगड राज्यातील कोरीया जिल्हातील साहू नावाचा तरुण तीन वर्षापासून गायब होता. तो मरण पावला हे गृहीत धरून घरच्यांनी छोटूचे वर्षश्राध्द घातले. मात्र तीन दिवसापुर्वी गहाळ अवस्थेत तो मढेवडगाव शिवारात आढळला. ग्रामपंचायत सदस्या पूजा साळवे, राहुल साळवे या दाम्पत्यांनी या तरुणाला घरी आणले. या तरुणाच्या नातेवाईकांचा सोशल मिडीयाच्या माध्यमातून शोध घेतला आणि आई-वडिलांना त्यांचा मुलगा अखेर मिळाला. याचा आनंदोत्सव मंगळवारी छत्तीसगढला साजरा झाला.
मढेवडगाव-श्रीगोंदा रस्त्यालगत मढेवडगाव शिवारात रस्त्याच्या बाजूला एक १६ ते १७ वर्ष वयोगटातील तरुण मागच्या आठवड्यात जखमी अवस्थेतदिसून आला. या तरुणाला अक्षय ससाणे व इतर मित्रांच्या मदतीने डॉ. प्रविण नलगे यांच्या दवाखान्यात घेऊन गेले. डॉ. नलगे यांनी तरुणावर मोफत उपचार केले. राहुल साळवे यांनी तरुणाला आपल्या घरी नेऊन चौकशी केली. त्याच्या संवादावरून तो छत्तीसगड राज्यातील कोरीया जिल्हातील असल्याचे निष्पन्न झाले.
तरुणांनी गुगलच्या माध्यमातून संपर्क क्रमांक मिळविले. कोरिया जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक चंद्रमोहन सिंग यांना याची माहिती दिली. तत्काळ चक्र फिरल्याने तो तरुण तीन वषार्पासून बोपत्ता असल्याची नोंद पोलिस स्टेशनला मिळाली.
मढेवडगावकरांनी या मतीमंद छोटुला कपडे घेतले. आझाद हिंद एक्स्प्रेसमध्ये बसवून दिले आणि तेथील पोलिसांना माहीती दिली. छोटू छत्तीसगडमध्ये पोहताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. छोटूला नातेवाईकांच्या ताब्यात देताना हेडकॉन्स्टेबल नारायणसिंह हे तरुणाच्या घरी जाऊन राहुल साळवे यांच्या मोबाईलवर व्हिडीओ कॉल करून तरुणाशी व घरच्यांशी त्यांचे बोलणे करुन दिले. त्यावेळी सदर तरुणाला व त्याच्या घरच्यांना अश्रू अनावर झाले. दरम्यान या छोटूचा मृत्यू झाल्याचे समजून त्याचे घरच्यांनी वर्षश्राद्धही घातले होते. मात्र त्याला जीवंत पाहून घरच्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
छत्तीसगड कोरिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी राहुल साळवे,अभय गुंड, प्रा. योगेश मांडे, सचिन ससाणे, राहुल साळवे, सनी कोळपे, अंबादास मांडे, गोरख शिंदे, गोरख उंडे व मढेवडगावकरांचे आभार मानले व कोरिया भेटीचे निमंत्रण दिले.