केंद्राच्या सूचनेनंतरच शाळांबाबत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 04:58 AM2020-08-17T04:58:24+5:302020-08-17T06:46:53+5:30
मात्र विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
अहमदनगर : केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना आल्यानंतरच राज्यात शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. मात्र विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
शासकीय विश्रामगृहावर ‘लोकमत’ शी बोलताना त्या म्हणाल्या, १५ जूनला अमेरिकेत शाळा सुरू झाल्यानंतर तेथे मुलांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाली होती. यामुळे केंद्र सरकारने ३१ आॅगस्टपर्यंत शाळा सुरू न करण्याचा निर्णय घेतला. आता केंद्र सरकारच्या सूचना आल्याशिवाय राज्यात शाळा सुरू होणार नाहीत. शाळा सुरू करण्याबाबत पालक व शिक्षण संस्थांचा संमिश्र प्रतिसाद असून स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एकत्रित निर्णय घ्यायचा आहे. १० वी व १२ वीच्या मुलांचे महत्वाचे वर्ष असून त्यांचा ताण कमी करण्यासाठी मुलांसोबत कनेक्टीव्हीटी वाढविण्याबाबत शिक्षकांनी प्रयत्न करावेत. फक्त स्मार्टफोनच नाही
तर साध्या फोनमार्फतही शिक्षक मुलांशी संवाद साधून त्यांचा ताण कमी करू शकतात.
>नव्या धोरणाबाबत तांत्रिक अडचणी
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राज्यात
बैठक घेतली. मात्र हे धोरण राबविण्याबाबत काही तांत्रिक अडचणी आहेत. त्यावर मात करावी लागणार आहे. दरवेळी
नवीन आयोग, नवीन संस्था स्थापन करण्याऐवजी आहे, त्या संस्थांमधील दोष दूर करून त्यांना बळकटी दिली पाहिजे, असे शिक्षणमंत्री गायकवाड यांनी सांगितले.