नगर जिल्ह्यात यंदा डेंग्यूच्या रुग्णात घट; मलेरियाही नियंत्रणात; डॉ.रजनी खुणे यांची माहिती

By अनिल लगड | Published: July 17, 2020 11:07 AM2020-07-17T11:07:57+5:302020-07-17T11:09:18+5:30

नगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. या वातावरणात कीटकजन्य आजार फैलावण्याचा मोठा धोका असतो. या पार्श्वभूमीवर मागील वर्षीच्या तुलनेत जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णात घट झाली आहे. तर मलेरियाची स्थितीतही वाढ किंवा घट नाही. तरी नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा हिवताप कार्यालयाच्या अधिकारी डॉ. रजनी खुणे यांनी बुधवारी (१५ जलै) ‘लोकमत’शी बोलताना केले. 

Decrease in dengue cases in Nagar district this year; Malaria also under control; Information of Dr. Rajani Khune | नगर जिल्ह्यात यंदा डेंग्यूच्या रुग्णात घट; मलेरियाही नियंत्रणात; डॉ.रजनी खुणे यांची माहिती

नगर जिल्ह्यात यंदा डेंग्यूच्या रुग्णात घट; मलेरियाही नियंत्रणात; डॉ.रजनी खुणे यांची माहिती

लोकमत संवाद /
 

डेंग्यू, मलेरियाचे मागील वर्षीच्या तुलनेत प्रमाण किती?

- मागील वर्षी जानेवारी ते जून २०१९ अखेर डेंग्यूचे २८ रुग्ण होते. यंदा फक्त ७ रुग्ण आहेत. त्यात जवळपास २१ रुग्णांची घट आहे. मागील वर्षी ११८ रक्त नमुने गोळा केले होते. यंदा ६० रक्त नमुने गोळा केले. त्यात ७ दूषित रुग्ण आढळून आले आहेत. तर मलेरियाचे मागील वर्षी ३ लाख ७ हजार ५९७ रक्त नुमने घेतले होते. त्यात फक्त २ रुग्ण आढळून आले होते. यावर्षी २ लाख ६४ हजार ३०० रक्त नमुने गोळा केले होते. त्यात २ रुग्ण आढळून आले. २०२५ पर्यंत जिल्ह्यात मलेरियाची निर्मूलन करण्यासाठी जिल्हा हिवताप कार्यालयाची वाटचाल सुरू आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत डेंग्यूच्या प्रमाण १२.०६ टक्क्यांनी घटले आहे. तर मलेरियात शून्य टक्क्यांची वाढ अथवा घट आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरियाची कशी तपासणी केली जाते?
- जिल्हा हिवताप कार्यालयाचे कामकाज जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदीप सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. नगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आम्ही प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत माध्यमांव्दारे जनजागृती करीत आहोत. याबाबत सर्व आरोग्य कर्मचारी, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी यांनाही मार्गदर्शन सूचना देण्यात आल्या आहेत. हे सर्व रात्रंदिवस कोरोना रोखण्यासाठी परिश्रम घेत आहेत.

या आजारांपासून कशी काळजी घ्यावी?
-डेंग्यू, मलेरिया हे दोन्ही आजार गंभीर आहेत. हे दोन्ही कीटकजन्य आहेत. कीटकांपासून ते होतात. यात आतापर्यंत अनेकांना जीव गमवावा लागला आहे. यासाठी नागरिकांनी झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा. व्हेंटपाईलपला जाळी बांधावी. घराच्या बाजूच्या पाणी साचणा-या वस्तूचा नायनाट करावा. उदा. छोटे डब्बे, फुटके कप, नारळ कवट्या, टायर्स, बाटलीचे झाकणे, निरोपयोगी वस्तू. खड्डे बुजवावेत. घराच्या खिडक्यांना जाळी बसवावी. झोपताना डांस प्रतिबंधक अगरबत्ती लावावी.

जिल्हा हिवताप कार्यालयाने याबाबत काय उपाययोजना केल्या आहेत?
- आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन ताप रुग्णांचे रक्तनमुने घेतात. त्याची प्रयोगशाळेत तपासणी केली जाते. यात रुग्ण दूषित आढळला तर त्याला समूळ उपचार देण्यात येतो. कीटकशास्त्रीय सर्वेक्षणामध्ये आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेविका, आशा सेविका यांच्यामार्फत घरोघरी जाऊन परिसरातील पाणीसाठे तपासणी करीत आहेत. दूषित आढळलेली कंटेनर त्वरित निकाम केली जातात. रिकामे न करण्यासारख्या कंटेनरमध्ये अ‍ॅबेट टाकले जाते. गप्पीमासे सोडण्यायोग्य डासोत्पत्ती स्थानामध्ये डासअळी भक्षक गप्पीमासे सोडण्यात येत आहेत. संशयित डेंग्यू रुग्णांचे  रक्तजल नमुने संकलित करून नगरमधील सेंटीनल सेंटरमध्ये तपासणीसाठी पाठिवले जात आहेत. दूषित आढळलेल्या रुग्णाच्या परिसरात जलद ताप सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येते. डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून नागरिकांची जनजागृती केली जाते. जून २०२० मध्ये हिवताप प्रतिरोध महिना साजरा करण्यात आला. जुलै २०२० मध्ये डेंग्यू प्रतिरोध महिना साजरा करण्यात येत आहे, असेही डॉ. रजनी खुणे यांनी सांगितले.

Web Title: Decrease in dengue cases in Nagar district this year; Malaria also under control; Information of Dr. Rajani Khune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.