पिकांवरील औषध फवारणीमुळे पक्ष्यांची घटतेय संख्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 02:00 PM2019-09-22T14:00:55+5:302019-09-22T14:01:30+5:30

माळा, गोफण, दगड, हाकारे असे  पूर्वीसारखे उभ्या पिकांचे राखण करतांना  शेतकरी दिसत नाही. कारण शेतावरील पक्ष्यांची संख्याच कमी झाली आहे.  गावातील उष्ट्या- खरकट्यावर ते आपली  गुजराण करु लागले आहेत.  तणनाशक आणि कीटकनाशक रासायनिक फवारणीमुळे  पक्ष्यांची संख्या कमी झाली आहे.

The decreasing number of birds is due to spraying the drug on the crop | पिकांवरील औषध फवारणीमुळे पक्ष्यांची घटतेय संख्या 

पिकांवरील औषध फवारणीमुळे पक्ष्यांची घटतेय संख्या 

पुंडलिक  नवघरे। 
कोळपेवाडी : माळा, गोफण, दगड, हाकारे असे  पूर्वीसारखे उभ्या पिकांचे राखण करतांना  शेतकरी दिसत नाही. कारण शेतावरील पक्ष्यांची संख्याच कमी झाली आहे.  गावातील उष्ट्या- खरकट्यावर ते आपली  गुजराण करु लागले आहेत.  तणनाशक आणि कीटकनाशक रासायनिक फवारणीमुळे  पक्ष्यांची संख्या कमी झाली आहे. कमी होण्यासाठी अनेक कारणे आहेत. मात्र शेतकरी आणि पक्षीमित्रांशी चर्चा केली असता अनेक धक्कादायक माहिती समोर येते.
   खरीप हंगामात कावळे, चिमण्या, साळुंक्या, ब्राम्हणीमैना आदी पक्षी रानात दिसायचे. या दिवसांत पिकांबरोबर रानात विविध गवतांची वाढ होत असते. त्यावर अळ्या, कीटक, फुलपाखरे जमा होतात. हेच पक्ष्यांचे आवडते खाद्य असल्याने पाखरं रानाकडे धाव घ्यायची. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. आधुनिक शेतीच्या नावाखाली शेतक-यांनी बांधावरील झाडे झुडपे तोडली. त्यामुळे पक्षांची आश्रयस्थाने नष्ट झाली. धान्य, गवतावरील अळ्या, कीटक खाऊन गुजराण करीत असतांना काही दिवसांनी गवत सुकून जाते. त्याच वेळेस उभ्या धाटांमध्ये धान्य भरु लागते व पक्षी कणसातील धान्याकडे वळतात. हे पक्षांचे अन्नचक्र आहे. बाजरी हे पक्ष्यांना खाण्यालायक धान्य. परंतु काळानुरुप त्यात बदल होत गेला. मका, सोयाबीन अशी पिके शेतकरी घेऊ लागले व पक्षांचे अन्न कमी झाले. गवत नाहीसे करण्यासाठी शेतक-यांनी आता  रासायनिक औषध फवारणीस सुरवात केली. त्यामुळे अळ्या कीटकांनी उभ्या पिकांचा फडशा पाडण्यास सुरवात केली. त्यावरचा उपाय म्हणून शेतक-यांनी पिकांवर औषध फवारणीला सुरवात केली. यामुळे पक्षांचे अन्न नाहीसे झाले. पर्यायाने पक्षांनी आता लोकवस्तींचा आश्रय घ्यायला सुरवात केली आहे.      
                आहारातही आता बदल झाला आहे. टाकून दिलेले उष्टे-खरकटे अन्न हे पक्षी खाऊ लागले आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रजनन क्रियेवर विपरित परिणाम झाला आहे. पिल्ले कमजोर पैदा होत आहेत. त्यांचे मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. 
 घरातील शिळे अन्न अंगणातील झाडाझुडपांना खत म्हणून टाकावे. अंगणात जमा होणाºया पक्ष्यांना जाड धान्य न टाकता भरड धान्य टाकावे म्हणजे त्यांना ते गिळण्यास त्रास होणार नाही, कोळपेवाडी येथील पक्षीमित्र चंद्रकांत लकडे यांनी सांगितले.
शेतीच्या बांधावर नारळासारखी उंच झाडे लावावी म्हणजे पीक घेण्यास त्यांचा त्रास होणार नाही. पक्ष्यांची आश्रयस्थानेही नष्ट होणार नाहीत, असे सुरेगाव येथील शेतकरी रवी देवकर यांनी सांगितले.    
    
 

Web Title: The decreasing number of birds is due to spraying the drug on the crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.