आजपासून मृग नक्षत्रास प्रारंभ; पेरणीची तयारी पूर्ण, मोठ्या पावसाची अपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2020 02:08 PM2020-06-07T14:08:35+5:302020-06-07T14:09:26+5:30
सात जून हे पावसाचे मुहूर्त. रविवारी पावसाच्या मृग नक्षत्राला सुरूवात होत आहे. दरवर्षी मृग नक्षत्राच्या आधीच्या दिवशी पडणारा पाऊस मात्र यंदा झाला नाही. खरिपाच्या पेरणीची शेतक-यांची तयारी केली आहे. आता मोठ्या पावसाची शेतक-यांना प्रतीक्षा लागली आहे.
अहमदनगर : सात जून हे पावसाचे मुहूर्त. रविवारी पावसाच्या मृग नक्षत्राला सुरूवात होत आहे. दरवर्षी मृग नक्षत्राच्या आधीच्या दिवशी पडणारा पाऊस मात्र यंदा झाला नाही. खरिपाच्या पेरणीची शेतक-यांची तयारी केली आहे. आता मोठ्या पावसाची शेतक-यांना प्रतीक्षा लागली आहे.
निसर्ग चक्रीवादळ झाल्यानंतर मान्सूनचा पाऊस जिल्ह्यात जोरदार येईल, असा हवामान खात्याचा अंदाज होता. मात्र चक्रीवादळानंतर आकाश निरभ्र झाले आहे.
खरिपाच्या पेरणीची शेतक-यांनी तयारी पूर्ण केली आहे. गतवर्षी ६ जूनपर्यंत जिल्ह्यात ०.२६ टक्के पाऊस झाला होता. यंदा मात्र वादळी आणि मान्सूनपूर्व पावसामुळे १६.५२ टक्के इतका पाऊस झाला आहे.
गतवर्षीच्या तुलनेत हा पाऊस जास्त असला तरी पेरणीसाठी आवश्यक असणारा पाऊस गरजेचा राहणार आहे.
उत्तरेत चांगला, तर दक्षिणेत रिमझिम
शुक्रवारी (दि. ५ जून ) जिल्ह्यात कुठे जोराचा तर कुठे रिमझिम पाऊस झाला. कोपरगाव (६३ मिमी.), राहुरी (२३ मिमी.), राहाता (२९ मिमी.), श्रीरामपूर (२१ मिमी.) या तालुक्यात चांगला पाऊस झाला.
नगर शहर (१ मिमी.),अकोले (२ मिमी.), संगमनेर (४ मिमी.), नेवासा (३ मिमी.) या तालुक्यांमध्ये रिमझिम पाऊस झाला. कोपरगाव तालुक्यात शुक्रवारी सर्वाधिक पाऊस झाला.
चार- पाच दिवस सलग पाऊस राहणार आहे. हा मान्सूनपूर्व पाऊस असेल. १२ किंवा १३ जूनला मान्सून जिल्ह्यात दाखल होईल. नगर आणि पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी शनिवारी पाऊस झाला. हा पाऊस सलग चार-पाच दिवस चांगला राहील.
-प्रा. बी. एन. शिंदे, हवामान तज्ज्ञ