पाण्याच्या शोधात असलेल्या हरणाचा वाहनांच्या धडकेत मृत्यू
By सुदाम देशमुख | Published: June 2, 2024 04:15 PM2024-06-02T16:15:31+5:302024-06-02T16:16:17+5:30
Ahmednagar: पाण्याच्या शोधात असलेल्या एका मादी जातीच्या हरणाचा नाशिक-पुणे महामार्गावर रस्ता ओलांडताना वाहनाची धडक लागून जागीच मृत्यू झाला. रविवारी (दि.०२) दुपारी दोनच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील वायाळवाडी (कुरकुंडी) परिसरात हा अपघात झाला.
घारगाव (अहमदनगर) : पाण्याच्या शोधात असलेल्या एका मादी जातीच्या हरणाचा नाशिक-पुणे महामार्गावर रस्ता ओलांडताना वाहनाची धडक लागून जागीच मृत्यू झाला. रविवारी (दि.०२) दुपारी दोनच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील वायाळवाडी (कुरकुंडी) परिसरात हा अपघात झाला.
हरणांचा कळप कुरकुंडी परिसरातून शेळकेवाडी (अकलापूर) शिवारात रविवारी दुपारी दोनच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्ग ओलांडून जात असताना एका मादी जातीच्या हरणाला कारची जोरदार धडक लागली. या अपघातात त्याचा मृत्यू झाला. रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांनी वनविभागास कळविले. त्यावेळी वनमजूर दीपक वायाळ यांनी घटनास्थळी येत मृत हरणाला महामार्गावरून बाजूला केले. मात्र, वनरक्षक व संबधित अधिकारी घटनास्थळी पोहोचले नाही. मृत हरणाला संगमनेर खुर्द येथील रोपवाटिकेत नेण्यात आले.
सध्या उन्हाची तीव्रता वाढली असून नागरिकांसहित पशु पक्ष्यांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. पाण्याच्या शोधात पशुपक्षी रस्त्यावर येतात आणि अशा प्रकारे अपघातात त्यांचा मृत्यू होतो. त्यामुळे वन विभागाच्या वतीने पशू पक्ष्यांसाठी पशू प्राण्यांचा वावर असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कृत्रिम पाणवठे सुरू करण्याची गरज आहे. पाण्यासाठी भटकणाऱ्या प्राण्यांना अपघाताबरोबरच शिकारीचा धोका वाढला आहे.