हिरण हत्याकांडाचा तपास अद्यापही गुलदस्त्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:20 AM2021-03-18T04:20:02+5:302021-03-18T04:20:02+5:30
श्रीरामपूर : बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांच्या अपहरण आणि हत्याकांडाचा घटनाक्रम अजूनही पूर्णत: उजेडात आलेला नाही. आरोपींनी हिरण ...
श्रीरामपूर : बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांच्या अपहरण आणि हत्याकांडाचा घटनाक्रम अजूनही पूर्णत: उजेडात आलेला नाही. आरोपींनी हिरण यांची हत्या कशी व कुठे केली? मृतदेह एमआयडीसी परिसरात कधी आला? यावर पोलिसांनी समाधानकारक उत्तर दिलेले नाही. त्यामुळे गुन्ह्याच्या तपासाकडे अजूनही लक्ष लागलेले आहे.
व्यापारी हिरण यांचे अपहरण १ मार्च रोजी करण्यात आले होते. त्यानंतर तब्बल सात दिवसानंतर येथील वाकडी रस्त्यावर रेल्वेमार्गानजीक त्यांचा मृतदेह मिळाला होता. पोलिसांनी प्रारंभी सागर गंगावणे व बिट्टू वायकर यांना अटक केली होती. मात्र, त्यांच्याविरोधात पुरावे मिळाले नाही. त्यामुळे त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. आता नव्याने अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. त्यांना शनिवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.
सिन्नर येथून अटक केलेल्या आरोपींमध्ये अजय चव्हाण, नवनाथ निकम, आकाश खाडे, संदीप हांडे, जुनेद शेख यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून अपहरण करण्यासाठी वापरण्यात आलेले वाहन जप्त करण्यात आले. हिरण यांचा मोबाईल फोन, बँकेचे चेकबूक, पावत्या मिळून आल्या. बेलापूर व उक्कलगाव येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणामुळे पोलिसांना वाहनाचा शोध लागला.
आरोपींनी हिरण यांची हत्या अपहरणावेळी केली तसेच त्यांचा मृतदेह एमआयडीसी येथे आणून टाकला असे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, सात दिवस मृतदेह तेथे नजरेस पडला नाही, याची शक्यता खूप कमी आहे. हा परिसर मोठ्या वर्दळीचा आहे. तेथे रेल्वे चौकीदेखील आहे. सात दिवस मृतदेह सहजासहजी दिसून आला असता. आरोपींकडून त्यावर अधिक प्रकाश पडणार आहे.
व्यापारी हिरण यांचा जुना कामगार असलेल्या आकाश खाडे हा कटाचा मुख्य सूत्रधार आहे. पैशांच्या लुटीच्या उद्देशाने आरोपींनी हे कृत्य केले. खाडे याने आपली दुचाकी बंद पडल्याचा बहाणा करून हिरण यांची मदत मागितली. तो हिरण यांच्या दुचाकीवरून लुटीसाठी सज्ज असलेल्या साथीदारांपर्यंत गेला. त्यामुळे खाडे याने ओळख लपविण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. त्यामुळे हत्येचे उद्दिष्ट अद्यापही स्पष्ट होऊ शकलेले नाही.