बनावट फेसबुक अकाउंट तयार करून पोलीस दलाची बदनामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:24 AM2021-09-22T04:24:36+5:302021-09-22T04:24:36+5:30
पाथर्डी : ‘मी पाथर्डीकर’ या नावाने फेसबुक पेज बनवून पोलीस दलाविषयी बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी दाखल तक्रारीवरून सायबर पोलिसांनी ...
पाथर्डी : ‘मी पाथर्डीकर’ या नावाने फेसबुक पेज बनवून पोलीस दलाविषयी बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी दाखल तक्रारीवरून सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास करत पाथर्डी पोलिसांना अहवाल सादर केला आहे. आता या प्रकरणात दोषी असलेल्या आरोपीविरोधात कारवाई करण्याचे आदेश उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे यांनी पाथर्डी पोलिसांना दिले आहेत.
संभाजी मंच्छिंद्र नागरे (रा. गोलेगाव, नागलवाडी, ता. पाथर्डी) या व्यक्तीच्या नावाने रजिस्टर्ड असलेल्या मोबाइल क्रमांकाच्या माध्यमातून सदर बनावट फेसबुक अकाउंट चालविले जात असल्याचे सायबर पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. या अकाउंटच्या माध्यमातून पोलीस दलाची प्रतिमा मलिन होईल, अशा पोस्ट व्हायरल केल्या होत्या. याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यातीलच एका कर्मचाऱ्याने तक्रार दाखल केली होती. यासंदर्भात सायबर पोलिसांनी नुकताच अहवाल सादर केला आहे. याबाबत मात्र दोषी असलेल्या आरोपीवर अद्यापपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही. पोलीस दलाची प्रतिमा मलिन करण्याचा काय उद्देश होता, तसेच या गुन्ह्यात एकूण किती आरोपींचा सहभाग आहे, या बाबी आता पाथर्डी पोलिसांच्या चौकशीत समोर येतील.
--------------------
पोलिसांची बदनामी केल्याप्रकरणी प्राथमिक चौकशी करून गुन्हा दाखल केला जाईल, तसेच सदर बनावट फेसबुक खात्यांची सायबर विभागामार्फत चौकशी केली जाईल.
-सुहास चव्हाण, पोलीस निरीक्षक, पाथर्डी पोलीस स्टेशन
---------------------------
बनावट फेसबुक अकाउंटप्रकरणी सायबर विभागाने दिलेल्या अहवालानुसार चौकशी करून दोषीविरोधात येत्या तीन दिवसांत कायदेशीर कारवाई करण्याबाबत पाथर्डी पोलिसांना आदेश दिले आहेत.
-सुदर्शन मुंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव
----------------------------