सदोष बियाण्यामुळेच कांद्याला ढेंगळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:19 AM2021-04-25T04:19:46+5:302021-04-25T04:19:46+5:30
शेकटे खुर्द येथील भागवत अशोक मार्कंडे या शेतकऱ्याने दीड एकर क्षेत्रामधील कांद्यांना खरेदी केलेल्या बोगस बियाणांमुळे ढेंगळे फुटल्याची लेखी ...
शेकटे खुर्द येथील भागवत अशोक मार्कंडे या शेतकऱ्याने दीड एकर क्षेत्रामधील कांद्यांना खरेदी केलेल्या बोगस बियाणांमुळे ढेंगळे फुटल्याची लेखी तक्रार २२ मार्च रोजी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे केली होती. याबाबत दै. लोकमतने २ एप्रिल रोजी ‘लावले कांदे..उगवून आले ढेंगळे..’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले. याची दखल घेत सोमवारी (दि.५) तालुकास्तरीय बियाणे तक्रार निवारण समितीने प्रक्षेत्र पाहणी केली. पाहणीदरम्यान, समितीने कांदा पिकाचे एक बाय एक मीटर क्षेत्रावरील तीन ठिकाणची निरीक्षणे घेतली. यामध्ये डेंगळे कांद्याचे सरासरी प्रमाण १६ टक्के, दुभळे ४६ टक्के तर चांगले कांदे ३८ टक्के आढळून आले. तसेच शेतकरी आलू रूपा राठोड यांच्या समांतर प्रक्षेत्राची पाहणी करून स्वतंत्र निरीक्षणे नोंदवली. यानुसार भूमिपुत्र सीडस् (मु.शिवानी पिसा, ता.लोणार, जि.बुलडाणा) या कंपनीचे बियाणे सदोष असल्याचे नुकतेच संबंधित शेतकऱ्यास टपालाद्वारे मिळालेल्या अहवालात म्हटले आहे. या तक्रार निवारण समितीमध्ये पंचायत समितीचे कृषी अधिकारी राहुल कदम, तालुका कृषी अधिकारी किरण मोरे, विषय विषेशज्ञ नंदकिशोर दहातोंडे, मंडळ कृषी अधिकारी श्रृतिका नलवडे, कृषी सहायक सुभाष बारगजे, कृषी पर्यवेक्षक एकनाथ चेमटे, भूमी ॲग्रो ट्रेडर्सचे संदीप कंठाळे, शेतकरी प्रतिनिधी तात्यासाहेब मार्कंडे, कोंडीराम मार्कंडे, प्रथमेश सोनवणे, नानासाहेब गोर्डे, तक्रारदार शेतकरी भागवत मार्कंडे आदींच्या समावेशाचा उल्लेख आहे.
------
बोगस कांदा बियाणांमुळे माझे खूप नुकसान झाले आहे. गेल्या तीन साडेतीन महिन्यांची रात्रंदिवस घेतलेली मेहनत ही वाया गेली. केवळ शेतीवरच कुटुंबाची उपजीविका असल्याने सध्या आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे.
- भागवत अशोक मार्कंडे, शेतकरी, शेकटे खुर्द.
.........
फोटो ओळी----
शेकटे खुर्द येथील भागवत मार्कंडे यांच्या कांदा पिकाची पाहणी करताना तालुका कृषी अधिकारी राहुल कदम, तक्रार निवारण समिती सदस्य व शेतकरी.