गर्दीच्या ठिकाणी निश्चितच डबल मास्क घालावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:34 AM2021-05-05T04:34:23+5:302021-05-05T04:34:23+5:30
संगमनेर : डबल मास्क गरजेचा आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी डबल मास्क घालावा, असे आवाहन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी ...
संगमनेर : डबल मास्क गरजेचा आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी डबल मास्क घालावा, असे आवाहन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विटरद्वारे केले होते. डबल मास्क वापरल्याने कोरोनाचा धोका कमी होतो. असे तज्ज्ञांचे देखील मत आहे. मात्र, काहींना फार वेळ डबल मास्क घालणे शक्य होत नाही; परंतु गर्दीच्या ठिकाणी जात असाल तर निश्चितच डबल मास्क घालावा, असेही काही तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले.
वरळीतील जम्बो सेंटरची पाहणी करत असताना सोशल मीडियावरील फोटो पाहून अनेकांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना विचारले की, डबल मास्क कशासाठी, त्यावर डबल मास्क गरजेचा आहे ! मी सर्वांना विनंती करतो की, ज्यांना शक्य असेल त्यांनी डबल मास्क घालावा. घरी राहा, मास्क वापरा, हात स्वच्छ ठेवा ! सुरक्षित राहा ! असे आवाहन मंत्री ठाकरे यांनी केले होते.
कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी मास्क घालावा. असे आवाहन कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून शासन, प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मास्क न घालणाऱ्या नागरिकांकडून आतापर्यंत मोठ्या स्वरूपात दंडदेखील वसूल करण्यात आला. विनामास्क फिरणाऱ्यांवर आजही कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना मास्क घालण्याची सवय अनेकांच्या आंगवळणी पडली.
बाजारात कापडी मास्क, सर्जिकल मास्क, एन ९५ असे मास्क उपलब्ध आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या महाभयंकर लाटेत अनेकांनी डबल मास्क घालायला सुरुवात केली आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणाऱ्यांनी निश्चितच डबल मास्क वापरावा. तो चांगल्या प्रतीचा कोरोनापासून संरक्षण करणारा असावा. काही जण सर्जिकल मास्क लावून त्यावर एन ९५ मास्क घालतात; परंतू असे न करता आधी एन ९५ मास्क लावून त्यावर सर्जिकल मास्क घालावा.
जेणे करून गर्दीतून किंवा बाहेरून जाऊन आल्यानंतर सर्जिकल मास्कची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावता येईल. डबल मास्कच्या जाड आवरणामुळे कोरोना संसर्ग होण्याचा धोका कमी आहे. असे काही तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले; परंतु काहींना फार वेळ डबल मास्क घालणे शक्य होत नाही. डबल मास्क घातल्याने त्यांना गुदमरल्यासारखे वाटते. मात्र, कोरोनापासून बचावासाठी चांगल्या प्रतीचा मास्क घालणे गरजेचे आहेच.
--------------------
हवेतून कोरोना संसर्गाच्या प्रसाराचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. साधा कापडी मास्क घातल्याने कुठलेही संरक्षण मिळत नाही. गर्दीत जात असाल किंवा घराबाहेर पडत असाल तर चांगल्या प्रतीचा मास्क घालणे गरजेचे आहे. डबल मास्क घातला तर अगदी उत्तम आहे. प्रत्येकाने योग्य काळजी घ्यावी.
- डॉ. राजकुमार जऱ्हाड, वैद्यकीय अधीक्षक, घुलेवाडी ग्रामीण रुग्णालय, संगमनेर
----------------------
पूर्वी आपण एकच मास्क घालायचो; परंतु नवीन सूचनेनुसार दोन मास्क घालणे गरजेचे आहे. एकच मास्क घातल्याने कोरोनापासून पूर्णपणे संरक्षण होत नाही. त्यामुळे दोन मास्क घालाव्यात, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. एन ९५ मास्क असेल तर दोन मास्क घालण्याची गरज नाही.
-डॉ. शशिकांत मंगरूळे, प्रांताधिकारी, संगमनेर