दीनमित्र, कलापथकाद्वारे सत्यशोधक शाखांचा प्रचार-जी. ए. उगले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 13:26 IST2020-01-12T13:25:25+5:302020-01-12T13:26:20+5:30
गावोगावी सत्यशोधक शाखांची स्थापना करण्यासाठी कलापथकांचे सादरीकरण अन् ‘दीनमित्र’च्या माध्यमातून प्रचार, प्रसाराचे तंत्र अवलंबिले जात असे, अशी माहिती सत्यशोधक चळवळीचे अभ्यासक प्रा. जी. ए. उगले यांनी दिली.

दीनमित्र, कलापथकाद्वारे सत्यशोधक शाखांचा प्रचार-जी. ए. उगले
चंद्रकांत गायकवाड ।
तिसगाव : सोमठाणे (ता. पाथर्डी) येथे सत्यशोधक समाज शाखेची स्थापना १९०६ मध्ये झाली. यादवराव मल्हारी शिदोरे या शाखेचे उपाध्यक्ष होते. सत्यशोधक समाजाचे पाचवे दोन दिवशीय अधिवेशन ११ व १२ मे १९१५ रोजी अहमदनगर येथे त्यावेळचे गंगाधर बागडे नाट्यगृह (छाया सिनेमागृह) येथे पार पडले. या अधिवेशनाच्या खर्चास यादवराव यांनी सर्वाधिक म्हणजे २५ रूपये (आजचे २५ हजार रूपये) निधी दिला होता. गावोगावी सत्यशोधक शाखांची स्थापना करण्यासाठी कलापथकांचे सादरीकरण अन् ‘दीनमित्र’च्या माध्यमातून प्रचार, प्रसाराचे तंत्र अवलंबिले जात असे, अशी माहिती सत्यशोधक चळवळीचे अभ्यासक प्रा. जी. ए. उगले यांनी दिली.
२९ डिसेंबर २०१९ रोजी ‘दीनमित्र’च्या छापखाण्याचा वाडा दुर्लक्षित व ५ जानेवारी २०२० रोजी ‘दीनमित्र’च नव्हे तर दोन काव्यखंड राक्षसगण नाटकाची सोमठाणेच जन्मभूमी, अशा आशयाचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर हे गाव पुन्हा चर्चेत आले. त्यानंतर उगले यांनी गुरुवारी सोमठाणे येथे भेट दिली व तेथील रहिवाशांसी संवाद साधला.
दीनमित्रच्या सुरुवातीच्या काही अंकांत यादवराव शिदोरे यांचेही लेखन प्रसिद्ध होत असे. यादवराव यांच्या अथक प्रयत्नांनी सोमठाणेत प्राथमिक शाळा सुरू झाली. त्यांना कृष्णराव नावाचा एक मुलगा होता. तो अहमदनगर कोर्टात नोकरीस होता. सीताराम, मुंजाबा असे दोन बंधू त्यांना होते. त्यांचाही दीनमित्रमध्ये लेखन सहभाग होता.
धुराजी कान्होजी शिदोरे कलापथकाचे व्यवस्थापक होते. अशा तत्कालीन प्रकाशित झालेल्या नोंदी उगले यांनी यादवराव शिदोरे यांचे पुतणे जगन्नाथ आणी नातू कानिफनाथ, दिलीपराव, पंडितराव तर हरिभाऊ शिदोरे यांचे नातू संभाजी यांना दाखविल्या.
सोमठाणेत ‘दीनमित्र’चा शताब्दी सोहळा..
२१ जानेवारी २०१९ ला ‘दीनमित्र’चे शताब्दी वर्षे आहे. सोमठाणेचे यादवराव शिदोरे अन् तरवडीचे मुकुंदराव पाटील यांच्या तिस-या पिढीचे वंशज सोमठाणेच्या वाडावस्तीवर या निमित्ताने एकत्र येऊन हा सोहळा साजरा करणार आहेत. त्याबाबतही गुरूवारी उत्तमराव पाटील व शिदोरे बंधूंमध्ये भ्रमणध्वनीवरून संवाद झाला.