साई संस्थानच्या वाहनांवरचे ‘महाराष्ट्र शासन’ नाव हटवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 05:46 PM2018-08-31T17:46:26+5:302018-08-31T17:46:30+5:30
श्री साईबाबा संस्थानच्या दोन वाहनांवर टाकलेली ‘महाराष्ट्र शासन’ ही नावे ७ दिवसात काढण्याची नोटीस श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने बजावली आहे.
शिर्डी : श्री साईबाबा संस्थानच्या दोन वाहनांवर टाकलेली ‘महाराष्ट्र शासन’ ही नावे ७ दिवसात काढण्याची नोटीस श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने बजावली आहे.
संस्थानच्या मालकीच्या एम. एच. १७, ए. जे. ८८८९ व एम. एच. १७, बी. व्ही. १५१० या दोन कारच्या बॉनेटवर दर्शनी भागात ‘महाराष्ट्र शासन’ अशी नावे टाकून चालविली जात असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे केली होती. त्यानुसार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ए. ए. खान यांनी मोटार वाहन कायदा १९८८ अन्वये संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस जारी केली. तसेच संस्थानच्या दोन्ही वाहनांवर‘महाराष्ट्र शासन’ अशी नावे टाकून ती चालविणे, ही बाब गंभीर असल्याचे म्हटले आहे. सदरची नावे काढून ७ दिवसात संबंधित कार्यालयास खुलासा सादर करावा. अन्यथा वाहनांची नोंदणी रद्द केली जाईल, असे खान यांनी नोटीसमध्ये नमूद केले आहे. या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे.
साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या ‘आयएएस’ अधिकारी आहेत. त्यांना ‘महाराष्ट्र शासन’ नाव असलेले वाहन वापरण्यास परवानगी आहे. वरील दोन पैकी एक वाहन त्या वापरतात, असे कळविण्यात आले आहे. परंतु संस्थानच्या कुठल्याही विश्वस्ताला तशी मुभा नाही. या संदर्भात चौकशी चालू असून तशी नोटीस दिली आहे. संस्थानचा खुलासा आल्यानंतर योग्य ती कारवाई होईल.
-ए . ए . खान, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी