राष्ट्रीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत दिल्लीच्या मुलींचीही सुवर्णकमाई; महाराष्ट्राच्या मुलांनी पटकावले सांघिक विजेतेपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 05:27 PM2020-01-06T17:27:47+5:302020-01-06T17:28:29+5:30
राष्ट्रीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलांनी कर्नाटकवर मात करीत सांघिक विजेतेपद पटकावले. तर मुलींमध्ये उपांत्यफेरीतच महाराष्ट्राच्या संघाचे शटललॉक करणा-या दिल्लीच्या डीएव्ही संघाने अंतिम सामन्यातही विजयी पताका फडकावत सुवर्णपदकावर नाव कोरले.
अहमदनगर : राष्ट्रीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलांनी कर्नाटकवर मात करीत सांघिक विजेतेपद पटकावले. तर मुलींमध्ये उपांत्यफेरीतच महाराष्ट्राच्या संघाचे शटललॉक करणा-या दिल्लीच्या डीएव्ही संघाने अंतिम सामन्यातही विजयी पताका फडकावत सुवर्णपदकावर नाव कोरले.
येथील वाडिया पार्क क्रीडा संकुलात गेल्या तीन दिवसांपासून १९ वर्ष वयोगटातील राष्ट्रीय शालेय बॅडमिंटन स्पर्धा सुरु आहेत. रविवारी सांघिक क्रीडा प्रकारातील अंतिम फेरीचे सामने रंगले़ तत्पूर्वी शनिवारी उपांत्यपूर्व व उपांत्य फेरीतील सामने झाले. उपांत्यपूर्व फेरीत महाराष्ट्राच्या मुलींना दिल्लीच्या डीएव्ही पब्लिक स्कूल संघाने मात दिली. तर मुलांच्या महाराष्ट्र संघाने स्पर्धेतील साखळी व बाद फेरीतील एकही सामना न गमावता संपूर्ण स्पर्धेवर छाप सोडली.
अंतिम फेरीत मुलांमध्ये महाराष्ट्राचा रोहन थूल (ठाणे) व कर्नाटकचा बी़ एस़ वैभव यांच्यात एकेरी लढत झाली. यात थूल याने पहिला सेट ७-२१ ने गमावला होता. मात्र, पुढच्या दोन्ही सेटमध्ये त्याने दमदार पुनरागमन करीत वैभव याचा २१-१९, २१-१७ अशा गुणांनी पराभव केला. त्याचवेळी दुसºया कोर्टवर महाराष्ट्राचा तनिष्क सक्सेना (मुंबई) व कर्नाटकचा साकेत सीएस यांच्यात लढत सुरु होती. या लढतीत तनिष्कने पहिल्यापासून आघाडी घेत साकेतवर २१-१९, २१-११ असा मोठा विजय मिळवून सरळसेटने सामना जिंकला. दुहेरीत महाराष्ट्राच्या रोहन थूल-शंतून पवार (नाशिक) जोडीवर कर्नाटकच्या साकेत सीएस-सुहास व्ही जोडीने १४-२१, २०-२२ ने विजय मिळविला़ दुहेरीत महाराष्ट्राला पराभव पत्कारावा लागला़ त्यामुळे ३ पैकी २ सामने जिंकणा-या महाराष्ट्राला सुवर्णपदक तर १ सामना जिंकणा-या कर्नाटकला रौप्यपदक मिळाले. कांस्य पदकासाठी बिहार व तामिळनाडू यांच्यात लढत झाली़. तामिळनाडूने २-१ ने सामना जिंकत कांस्यपदक पटकावले. मुलींमध्ये दिल्लीच्या दोन्ही संघांनी स्पर्धेवर पूर्ण वर्चस्व गाजवले. सांघिकमध्ये दिल्ली येथील डीएव्ही पब्लिक स्कूल व दिल्ली राज्याचा असे दोन्ही संघ अंतिम फेरीत दाखल झाले. एकेरीत डीएव्हीच्या दीपशिखा सिंग हिने दिल्लीच्या दुर्वा गुप्तावर २१-११, १८-२१, २१-११ असा विजय मिळविला. दुहेरीत दीपशिखा सिंग-लिखिता श्रीवास्तव जोडीने दिल्लीच्या अद्या पाराशर व दुर्वा गुप्ता जोडीवर २१-१३, २१-१४ असा सरळसेटमध्ये विजय मिळविला. डीएव्हीने दिल्लीवर २-० असा मोठा विजय मिळवून सुवर्ण कमाई केली. दिल्लीला रौप्य पदाकावर समाधान मानावे लागले. तर राजस्थानने कर्नाटकवर २-१ने विजय मिळवून कांस्य पदकाची कमाई केली़.