जामखेड तालुक्याचा भ्रमनिरास : कुकडी प्रकल्पाचा सुधारित आराखडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 06:07 PM2018-09-20T18:07:42+5:302018-09-20T18:07:56+5:30
कुकडी प्रकल्पातून तालुक्याला दोन टी.एम. सी. पाणी मिळावे, ही ३५ वर्षांपासूनची मागणी आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे आंदोलन झाले.
जामखेड : कुकडी प्रकल्पातून तालुक्याला दोन टी.एम. सी. पाणी मिळावे, ही ३५ वर्षांपासूनची मागणी आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे आंदोलन झाले. आघाडी सरकारच्या काळात पिण्यासाठी चौंडी येथील बंधाऱ्यात पाणी सोडण्याचा निर्णय झाला. याच मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणारे पालकमंत्री राम शिंदे यांच्या पुढाकारातून कुकडी प्रकल्पाचा तिसरा सुधारित प्रकल्प आराखडा मंजूर झाला आहे. पण त्यानुसार तालुक्यातील ८९ गावांपैकी चौंडी, जवळा या दोनच गावांचा समावेश आहे. त्यांचा अपवाद सोडल्यास संपूर्ण तालुका शेतीच्या पाण्यासाठी वंचित राहणार आहे. त्यामुळे जामखेडकरांचा भ्रमनिरास झाला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर याच प्रकल्पासाठी आमदार राम शिंदे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. २०१२-१३ मध्ये तत्कालिन विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या प्रयत्नातून रूख्मिणी खिंडीतून ओढे, नाले व सीना नदी पात्रातून पिण्याच्या पाण्यासाठी चौंडी येथील बंधाºयात कुकडीचे पाणी सोडण्यात आले. यानंतर जवळा बंधाºयात पाणी सोडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रयत्न करण्यात आला. बंधाºयापर्यंत पाणी येईपर्यंत ते बंद झाले होते. तेव्हापासून आतापर्यंत जवळा बंधाºयात पाणी आले नाही. पण मागणी मात्र कायम होती.
जामखेड तालुका अवर्षण प्रवण आहे. शेजारील आष्टी, करमाळा, कर्जत तालुक्याला पाणी देताना जामखेड तालुका टाळला गेला. कुकडी प्रकल्पाच्या सुधारित पाणी वाटपात तालुक्यातील किती हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल? याबाबत पालकमंत्री राम शिंदे यांनी बोलणे त्यांनी टाळले.
‘‘तालुक्याला कुकडीचे हक्काचे दोन टिएमसी पाणी मिळण्यासाठी ३५ वर्षांपासून दिवंगत नेते पांडुरंग गदादे यांनी आंदोलन केले. केले. त्यांच्याबरोबर आम्ही रास्ता रोको, उपोषण केले. आमच्या नावावर गुन्हे दाखल आहेत. सुधारित आराखड्यात तालुक्याला न्याय मिळेल, असे वाटले होते. पण पालकमंत्री राम शिंदे हे अपयशी ठरले. त्यांनी तालुक्याच्या तोंडाला पाने पुसली आहेत. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन उभारणार आहे.’’ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रा.मधुकर राळेभात यांनी मत व्यक्त केले.
‘‘कायमस्वरूपी दुष्काळी जामखेड तालुक्यास सुधारित आराखड्यानुसार फक्त चौंडी व जवळा बंधाºयात पाणी येणार आहे. नवीन कालवे तसेच अस्तरीकरणामुळे पाण्याची गळती कमी होईल. त्यामुळे बचत झालेल्या पाण्यातून तालुक्याला वाढीव पाणी मिळायला पाहिजे होते. ते मिळविण्यात पालकमंत्र्यांना अपयश आले आहे. तालुक्यात किती हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार,याबाबत पालकमंत्र्यांनी आकडेवारी द्यावी.’’ अमोल राळेभात, कर्जत जामखेड युवक काँग्रेस अध्यक्ष.
‘‘कुकडीतून तालुक्याला पाणी मिळण्याची जुनी मागणी आहे. सुधारित आराखड्यातील आकडेवारी फुगिर आहे. तालुक्याला न्याय देण्यात पालकमंत्री अपयशी ठरले. निधी कधी मिळणार? काम कधी सुरू होणार?हे अनिश्चित आहे. केवळ दिखावा आहे. आगामी निवडणुकींसाठीची ही चाल आहे.’’- दत्तात्रय वारे, जिल्हा सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस.
‘‘आराखड्यानुसार तालुक्यातील जवळा, चौंडी येथील बंधाºयात पाणी येणार आहे. त्यामुळे तेथील परिसराला लाभ होईल. ही सुरूवात आहे. आगामी काळात तालुक्यातील उर्वरित भागात पाणी देण्यासाठी पालकमंत्री राम शिंदे प्रयत्नशील आहेत.’’ - रवींद्र सुरवसे, तालुकाध्यक्ष भाजप.