दानवे आचारसंहितेच्या कचाट्यात :प्रचारसभेत ३०० कोटींचा उल्लेख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 01:35 PM2018-11-29T13:35:14+5:302018-11-29T13:35:28+5:30
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधात अपक्ष उमेदवाराने आचारसंहिता भंगाची तक्रार केल्याने दानवे अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत.
अहमदनगर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधात अपक्ष उमेदवाराने आचारसंहिता भंगाची तक्रार केल्याने दानवे अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत. नगरमध्ये भाजपला सत्ता दिली तर ३०० कोटींचा निधी देऊ, असे विधान त्यांनी नगरमधील प्रचारसभेत केले होते. त्यासंदर्भात प्रभाग १२मधील अपक्ष उमेदवार केतन गुंदेचा यांनी दानवे यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे.
दानवे यांच्या उपस्थितीत गेल्या रविवारी भाजप प्रचाराचा प्रारंभ सावेडीतील भिस्तबाग चौकात झाला. त्यावेळी आयोजित सभेत त्यांनी ३०० कोटींच्या निधीचा उल्लेख केला. भाजपा सत्तेवर आल्यानंतर पुणे शहरात विमानतळ आणले आणि त्यासोबत मेट्रोही आणली़ सरकारकडे पैशांची कमी नाही़ केंद्र आणि राज्यातून आलेला पैसा आपल्या गल्लीपर्यंत आणायचा असेल तर भाजपाच्या प्रामाणिक नगरसेवकांना निवडून द्या. नगर शहराचा महापौर भारतीय जनता पार्टीचा करा, याच व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांना आणून नगर शहराच्या विकासासाठी ३०० कोटी रुपये देतो, अशी घोषणा त्यांनी केली. या त्यांच्या विधानावरच प्रभाग १२मधील अपक्ष उमेदवार केतन गुंदेचा यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांचे हे वक्त्यव्य म्हणजे मतदारांसाठी प्रलोभन आहे. शहरात महापालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. त्यात दानवेंची ही घोषणा म्हणजे आचारसंहितेचा भंग असल्याची तक्रार गुंदेचा यांनी निवडणूक निर्णय अधिका-यांकडे केली आहे.
दरम्यान, आचारसंहिता भंगाच्या अनेक तक्रारी आचारसंहिता कक्षाकडे दाखल झाल्या असून त्यावर कार्यवाही सुरू आहे. त्यातच राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त जे. एस. सहारिया उद्या ( शुक्रवारी ) नगर दौºयावर येत असल्याने ते या तक्रारींवर काय कार्यवाही करतात, याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे.