श्रीराम मंदिर ट्रस्ट बरखास्त करण्याची मागणी; धर्मादाय उपआयुक्तांकडे तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2020 11:39 AM2020-11-04T11:39:35+5:302020-11-04T11:40:44+5:30
शेवगाव येथील श्रीराम मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तांनी देवस्थानला इनाम म्हणून मिळालेल्या ३१ एकर भूखंडाचे बेकायदा भाडेकरार केल्याचे सिद्ध झाल्याने हे विश्वस्त मंडळ बरखास्त करावे, अशी मागणी सय्यद आयुब बशीर या नागरिकाने धर्मादाय उपआयुक्त यांचेकडे केली आहे.
अहमदनगर: शेवगाव येथील श्रीराम मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तांनी देवस्थानला इनाम म्हणून मिळालेल्या ३१ एकर भूखंडाचे बेकायदा भाडेकरार केल्याचे सिद्ध झाल्याने हे विश्वस्त मंडळ बरखास्त करावे, अशी मागणी सय्यद आयुब बशीर या नागरिकाने धर्मादाय उपआयुक्त यांचेकडे केली आहे.
श्रीराम मंदिर ट्रस्टने देवस्थानचे भूखंड तीन वर्षांच्या भाडेकराराने दिले आहेत. या भाडेकराराच्या जोरावर या भूखंडांवर पक्क्या इमारती उभ्या राहिल्या असून परमिटरुमसारखे व्यवसायही सुरु झाले आहेत. यासंदर्भात सय्यद यांनी यापूर्वीही धर्मादाय उपआयुक्त कार्यालयाकडे तक्रार केली होती. मात्र, या कार्यालयाच्या निरीक्षकांनी चौकशीत या बाबींकडे दुर्लक्ष करत गोलमाल अहवाल दिला.
या भूखंडांबाबत शेवगावच्या तहसीलदारांनी केलेल्या चौकशीत हे सर्व भाडेकरार बेकायदेशीरपणे व महसूल विभागाची कुठलीही परवानगी न घेता करण्यात आल्याचे आढळले आहे. त्यामुळे तहसीलदारांनी देवस्थानच्या उताऱ्यावर इतर हक्कात लागलेल्या भाडेकरुंच्या नावाच्या नोंदी रद्द केल्या आहेत. तहसीलदारांचा हा आदेश प्रांताधिकारी व अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनीही कायम ठेवला आहे. यावरुन देवस्थानच्या विश्वस्तांनी बेकायदा भाडेकरार करुन आपल्या अधिकारांचा दुरुपयोग केला हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे या विश्वस्तांवरही कारवाई करा, अशी मागणी करण्यात आली आहे. एका विश्वस्ताच्या मुलानेच या भूखंडावर मेडिकल व्यवसाय सुरु करुन अधिकाराचा दुरुपयोग केला आहे. करार संपल्यानंतरही विश्वस्तांनी भूखंड ताब्यात घेतलेले नाहीत. धर्मादाय आयुक्तांनी लिलाव करुनच भूखंड भाडेकराराने देता येतील असा स्पष्ट आदेश दिला असतानाही लिलाव न करताच मनमानीपणे भूखंड भाडेकराराने देण्यात आले आहे. त्यामुळे या सर्व बाबींना जबाबदार धरत विश्वस्त मंडळ बरखास्त करावे, असे सय्यद यांचे म्हणणे आहे. निरीक्षकांनी योग्य चौकशी न केल्याने त्यांचेवर कारवाई करण्यासंदर्भातही सय्यद यांनी यापूर्वीच सहधर्मादाय आयुक्तांकडे तक्रार केली आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया घेण्यासाठी ‘लोकमत’ने विश्वस्त मंडळाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा संपर्क होऊ शकला नाही.
ट्रस्टच्या जागेत मोबाईल टॉवर
ट्रस्टच्या जागेत एका भाडेकरुने मोबाईल कंपनीला टॉवर उभारण्यास परवानगी दिली आहे, असेही तक्रारीत म्हटले आहे. विशेष म्हणजे विद्युत वितरण कंपनीनेही या टॉवरसाठी वीज पुरवठा केला आहे. यासंदर्भात आपण महावितरणकडे माहिती अधिकारात माहिती मागितली आहे, मात्र ती दिली जात नाही, अशीही सय्यद यांची तक्रार असून माहिती मिळण्यासाठी त्यांनी अपिल दाखल केले आहे.