संगमनेरात पर्यावरणपूरक गणेशमूर्तींना मागणी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:25 AM2021-09-04T04:25:24+5:302021-09-04T04:25:24+5:30
संगमनेर : पन्नास वर्षांपूर्वी लाल व शाडू मातीचा वापर करून दिवंगत वासुदेव रामचंद्र उपासनी हे पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवायचे. मात्र, ...
संगमनेर : पन्नास वर्षांपूर्वी लाल व शाडू मातीचा वापर करून दिवंगत वासुदेव रामचंद्र उपासनी हे पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवायचे. मात्र, कालांतराने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींना मागणी वाढू लागली. त्यामुळे त्यांनी गणेशमूर्ती साकारण्याचे काम बंद केले. गेल्या काही वर्षांपासून पुन्हा पर्यावरणपूरक गणेशमूर्तींना मागणी वाढल्याने उपासनी कुटुंबीयांनी शाडू मातीपासून गणेशमूर्ती साकारल्या आहेत. या मूर्तींना परदेशातील भाविकांकडूनदेखील मागणी आहे. १२६ वर्षांची गणेशोत्सवाची परंपरा संगमनेरला लाभली आहे. १८९५ साली शहरातील रंगारगल्ली येथून सार्वजनिक गणेशोत्सवाला प्रारंभ झाला. त्यावेळी नामदेव मिस्त्री (खरे) व सुंदर मिस्त्री (खरे) या खरे बंधूंनी सोमेश्वर मंडळाची मानाची ‘श्रीं’ची मूर्ती साकारली होती. त्यानंतर खऱ्या अर्थाने शहर व तालुक्यात सार्वजनिक व घरगुती गणेशोत्सवाला सुरुवात झाली. या उत्सवाला भव्य स्वरूप प्राप्त झाले. गणेशमूर्ती बनविण्याच्या माध्यमातून मोठा रोजगार निर्माण झाला. त्यातूनच अनेक कुटुंबे आपला उदरनिर्वाह करतात. गणेशोत्सव अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपला आहे. संगमनेरात जल्लोषपूर्ण वातावरणात गणेशोत्सव साजरा होत असतो. मात्र, यंदाही त्यावर कोरोनाचे सावट आहे. गणेशोत्सवात मांगल्य जपले जावे आणि पर्यावरणाचेही संवर्धन व्हावे, यासाठी शाडू मातीच्या मूर्तींची मागणी गणेश भक्तांबरोबरच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी केली असल्याचे मूर्तिकार योगेश उपासनी यांनी सांगितले.
-------------
शाडू मातीच्या गणेशमूर्तींची मागणी काही वर्षांपूर्वी कमी झाली होती. त्यामुळे वडिलांनी सुरू केलेला गणेशमूर्ती साकारण्याचा व्यवसाय फारच कमी केला होता. अनेक गणेश भक्तांनी पुन्हा शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्यासाठी प्रेरित केले. यंदा ऑस्ट्रेलिया, इंग्लंड येथे गणेशमूर्ती पाठविल्या आहेत. गेल्या वर्षीही परदेशात गणेशमूर्ती पाठविल्या होत्या.
- याेगेश उपासनी, मूर्तिकार, संगमनेर
----------------
गेल्या नऊ वर्षांपासून केवळ शाडू मातीपासून बनविलेल्या गणेशमूर्तींची विक्री करतो. दरवर्षी पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची मागणी वाढते आहे. अनेक सार्वजनिक गणेश मंडळांकडूनदेखील मागणी आहे. याबाबत प्रबोधन होणे गरजेचे आहे.
सुमित ईश्वर चायल, गणेशमूर्ती विक्रेते, संगमनेर
----------
फोटो नेम : ०२गणेशमूर्ती, संगमनेर