इम्युनिटी वाढविणाऱ्या औषधी वनस्पतींच्या रोपांची मागणी वाढली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:21 AM2021-05-06T04:21:26+5:302021-05-06T04:21:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : गेल्या वर्षभरापासून सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आधुनिक उपचार पद्धतीबरोबरच पारंपरिक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपरगाव : गेल्या वर्षभरापासून सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आधुनिक उपचार पद्धतीबरोबरच पारंपरिक आयुर्वेदिक उपचार पद्धतीमधील औषधी वनस्पतीदेखील उपयुक्त ठरत आहेत. त्यामुळे गेल्या वर्षभरात इम्युनिटी वाढविणाऱ्या नर्सरीमधील औषधी वनस्पतीच्या रोपांची मागणी वाढली आहे. वैदिक काळापासून आपल्याकडे वनौषधींचा वापर होत आलेला आहे. भारतातील ऋषिमुनींनी आयुर्वेद ही जगाला दिलेली देणगी आहे. त्यामुळे या उपचार पद्धतीस अनन्यसाधारण महत्व आहे. तर गेल्या काही वर्षात आधुनिक औषधांची उपचार पद्धती अवलंबली जात आहे. यामध्ये आयुर्वेदिक उपचार पद्धतीतून काही आजारांवर काही दिवसांत गुण येतो तर काही आजारांवर मात करण्यासाठी काही कालावधी लागतो. मात्र , यातून कोणताही दुष्परिणाम होत नाही. याउलट आधुनिक उपचार पद्धतीत आजारावर तत्काळ मात करता येते. मात्र, या उपचार पद्धतीचा सातत्याने वापर किंवा अतिरेक झाला तर त्याचे निश्चितच दुष्परिणाम होतात, असे तज्ज्ञांचे मत आहे.
गेल्या वर्षभरात कोरोना महामारीमुळे सर्वत्र थैमान घातले आहे. हा आजार जीवघेणा असल्याने यात अनेकांचे बळीदेखील गेले आहेत. यावर मात करण्यासाठी मानवी शरीरातील इम्युनिटी चांगली असल्यास उपचार घेऊन या जीवघेण्या आजारावरसुद्धा मात करता येऊ शकते, असा ठाम विश्वास वैद्यकीय क्षेत्रात वर्तविला जात आहे. आणि हीच इम्युनिटी वाढविण्यासाठी आयुर्वेदात असंख्य औषधी वनस्पती आहेत. त्यात अगदीच सहज उपलब्ध होणारी तुळस, अद्रक, अडुळसा, गुळवेल, अश्वगंधा यासह इतरही मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पती आहेत. गेल्या वर्षभरात प्रत्येक व्यक्ती आधुनिक उपचार पद्धतीबरोबरच आयुर्वेदातील वरील वनस्पतींचा उपयोग करीत इम्युनिटी वाढवित आहे. त्यामुळे अशा औषधी वनस्पती रोपांची घराच्या अंगणात, कुंड्यांमध्ये, गार्डनमध्ये, शेतात लागवड करीत आहेत.
----------------
अ) तुळस: सर्दी, खोकला, ताप, दातदुखी, श्वासावरोध, श्वासात दुर्गंधी, दमा, फुप्फुसांचे रोग, हृदयाचे विकार या सर्वांमध्ये तुळस वापरली जाते.
ब) गुळवेल : ताप, सर्दी आणि खोकल्याचा त्रास कमी करण्यासाठी रामबाण उपाय आहे. डेंग्यूच्या तापामध्ये आपल्याला शरीरातील रक्तपेशी कमी होतात, या समस्येपासून बचाव करण्यासाठी गुळवेलचे सेवन करणे फायदेशीर ठरते.
क ) अडुळसा : अडुळसाच्या मुळा, पाने, फुले, औषधीसाठी वापरतात. सर्दी, खोकला दमा, पोटातील जंत, जुलाब व त्वचारोग इत्यादींवर अडुळसा खूप गुणकारी आहे
ड) अद्रक : अपचन, पोट दुखणे, पोटात वायू,अन्न चविष्ट लागते. त्यामुळे भूक वाढते, सर्दी, कफ, श्वासनलिकेतील घाण बाहेर काढणे, श्वास घेण्यास त्रास व दम भरणे यावर प्रभावशाली औषध मानले जाते.
ई) अश्वगंधा : निद्रानाश, तणाव, रोगप्रतिकारक शक्तीसाठी उपयुक्त आणि अॅनाबॉलिक गुणकारी औषध म्हणून अश्वगंधाची ओळख आहे. अश्वगंधा ही एक औषधी वनस्पती आहे. आरोग्यासंबंधी विविध व्याधींवर या वनस्पतीचा उपयोग केला जातो.
..........
आमच्या नर्सरीमध्ये सुमारे शंभर प्रकारच्या औषधी वनस्पतींची रोपे तयार होतात. गेल्या काही दिवसांत यातील बहुतांश रोपांच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. त्यात सर्वाधिक प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त असलेल्या वनस्पतींची रोपे नेली जात आहेत.
- शरद निमसे, संचालक, सह्याद्री नर्सरी, अस्तगाव
.............
कोरोनाकाळात उपयुक्त ठरत असल्याने सध्या तुळस, गवती चहा, अडुळसा यांच्या रोपांची मागणी जास्त प्रमाणात आहे.
- शिवाजी पोटे, संचालक, निलांबरी रोपवाटिका, साकुरी