जम्बो ऑक्सिजन कोविड सेंटरची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:21 AM2021-04-25T04:21:06+5:302021-04-25T04:21:06+5:30
शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झालेल्या कोरोना आढावा बैठकीनंतर काळे यांनी वरील मागणी केली आहे. याबाबत तातडीने प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना ...
शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झालेल्या कोरोना आढावा बैठकीनंतर काळे यांनी वरील मागणी केली आहे. याबाबत तातडीने प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना मंत्री थोरात यांनी महापालिका आयुक्त शंकर गोरे यांना दिल्या आहेत. एमआयडीसीतील वखार महामंडळ तसेच मोठ्या प्रमाणात जागा असणाऱ्या ठिकाणांचा शोध घेण्याच्या सूचना थोरात यांनी मनपा आयुक्तांना बैठकीत केली. एमआयडीसीमध्ये असणाऱ्या ऑक्सिजन प्लांट मधून ऑक्सिजनचा पुरवठा सहजपणे होऊ शकतो. त्यामुळे या प्लांट जवळच शक्यतो जागा शोधण्यास प्राधान्य द्यावे अशी सूचना थोरात यांनी बैठकीत केली.
किरण काळे म्हणाले, भविष्यातील वाढणाऱ्या रुग्ण संख्येचा विचार करता नगर शहरामध्ये १००० ऑक्सिजन बेडची क्षमता असणाऱ्या जम्बो कोविड सेंटरची तातडीने उभारणी करण्यात यावी. अत्यवस्थ होणाऱ्या कोरोना रुग्णांसाठी या सेंटरमध्ये किमान २०० व्हेंटिलेटर बेडची व्यवस्था करण्यात यावी.
रेमडेसिविर इंजेक्शन मोफत उपलब्ध करून देण्यात यावे. या ठिकाणच्या सर्व सुविधा या नागरिकांसाठी विनामूल्य करण्यात याव्यात. तसेच ऑक्सिजनचा पुरवठा सातत्यपूर्ण राहील यासाठी मनपाने देखील स्वतःचा स्वतंत्र ऑक्सिजन प्लांट याठिकाणी उभा करावा अशी मागणी काळे यांनी बैठकीत केली.
किरण काळे म्हणाले की, सरकारी आरोग्य यंत्रणा म्हणून नगर शहरातील सर्वसामान्य नागरिकांना, गोरगरिबांना जिल्हा शासकीय रुग्णालयावर अवलंबून राहावे लागत आहे. मूळतः ही व्यवस्था ग्रामीण जिल्ह्यासाठी निर्माण केलेली आहे. शहरासाठी मनपा ही स्थानिक स्वराज्य संस्था असून त्यांची शहरातील नागरिकांसाठी आरोग्य यंत्रणा उभी करण्याची प्राथमिक जबाबदारी आहे.
जिल्हा प्रशासनाच्या धर्तीवर नगर शहरातील नागरिकांसाठी मनपाचा स्वतंत्र कोरोना मदत व नियंत्रण कक्ष तातडीने स्थापन करण्यात यावा. हा कक्ष २४ तास कार्यान्वित असावा. या कक्षात विविध विभागांची निर्मिती करून त्या विभागांसाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. सदर अधिकारी आणि या कक्षाचे हेल्पलाईन क्रमांक नागरिकांसाठी तातडीने जाहीर करण्यात यावे, अशी मागणी काळे यांनी बैठकीत काँग्रेसच्या वतीने मनपा आयुक्तांकडे केली आहे.
फोटो ओळी : महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झालेल्या कोरोना आढावा बैठकीत काँग्रेसच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी मनपाकडे नगर शहरासाठी १००० रुग्ण क्षमतेचे जम्बो ऑक्सिजन कोविड सेंटर उभारण्याची मागणी केली. यावेळी आ. डॉ. सुधीर तांबे, आ. लहू कानडे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, मनपा आयुक्त शंकर गोरे, यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
--------------------------