शासकीय कापूस खरेदी केंद्राचे टाळे उघडेना,शेतकऱ्यांना आर्थिक फटका ,चापडगाव येथील केंद्र सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 11:36 AM2020-04-18T11:36:56+5:302020-04-18T11:37:08+5:30
बोधेगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी होऊ नये म्हणून पणन महासंघाने कापुस खरेदी केंद्र बंद केली. अचानक खरेदी बंद केल्याने कापुस विक्रीसाठी घेऊन आलेली शेकडो वाहने अडकून पडली आहेत. तब्बल एक महिन्यांपासून शासकीय खरेदी केंद्राला टाळा असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. यामुळे चापडगाव येथील कापुस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केली जात आहे.
शासकीय कापूस खरेदी केंद्राचे टाळे उघडेना,शेतकऱ्यांना आर्थिक फटका ,चापडगाव येथील केंद्र सुरू करण्याची मागणी
बोधेगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी होऊ नये म्हणून पणन महासंघाने कापुस खरेदी केंद्र बंद केली. अचानक खरेदी बंद केल्याने कापुस विक्रीसाठी घेऊन आलेली शेकडो वाहने अडकून पडली आहेत. तब्बल एक महिन्यांपासून शासकीय खरेदी केंद्राला टाळा असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. यामुळे चापडगाव येथील कापुस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केली जात आहे.
शेवगाव तालुक्यातील चापडगाव येथे राज्य शासनाच्या पणन महासंघाचे कापुस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. परंतू कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन घोषित झाल्याने संसर्ग रोखण्यासाठी पणन महासंघाने कापुस खरेदी बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २० मार्चपासून येथील कापूस खरेदी बंद करण्यात आली होती. अचानक कापुस खरेदी बंद केल्याने याठिकाणी शंभर ते सव्वाशे कापुस भरलेली वाहने अडकून पडली आहेत. यातील बहुतांश वाहने शेतकऱ्यांनी भाडोत्री आणलेली आहेत. या वाहनांच्या भाड्याचा सारा भार शेतकऱ्यांच्या माथी आहे. जवळपास महिन्यांपासून वाहनाला खुटी लागल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. तसेच उन्हाचा चटका वाढत असल्याने कापसाचे वजनही घटत असल्याचे बोधेगाव येथील शेतकरी बाळासाहेब घोरतळे, पांडुरंग ढेसले, घनश्याम कासुळे, लक्ष्मण घोरतळे आदींनी सांगितले. यामुळे कोरोनाच्या चटक्यासोबत आर्थिक फटकाही सोसावा लागत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आल्याचे दिसते आहे.
-------
चौकट---
सहकार मंत्री व पालकमंत्र्यांना साकडे..
शेवगाव तालुक्यातील चापडगावसह इतर ठिकाणचे कापुस खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळावे. यासाठी शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीकडून सहकार मंत्री व पालकमंत्र्यांकडे शासकीय कापुस खरेदी सुरू करण्याची मागणी केली असल्याचे सभापती अॅड.अनिल मडके यांनी सांगितले आहे. तसेच यापूर्वी बाजार समितीचे माजी सभापती रामनाथ राजपूरे यांनीही मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे.
प्रतिक्रिया-----
माझा जवळपास ४० क्विंटल कापुस याठिकाणी एक महिन्यांपासून अडकून पडलेला आहे. उन्हाचा चटका वाढत असल्याने कापसाचे वजन घटत आहे. तसेच भाडोत्री नेलेली ट्रॅक्टर-ट्राॅली ही गुंतून पडली असून मोठी आर्थिक झळ बसत आहे.
- संदीप पांडुरंग ढेसले, शेतकरी बोधेगाव.