संगमनेरातील कोविड केंद्र पुन्हा सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:19 AM2021-03-18T04:19:33+5:302021-03-18T04:19:33+5:30
गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने भीतिदायक वातावरण तयार झाले होते. त्यानंतर, रुग्णसंख्या वाढत असताना स्थानिकांना संगमनेरातच उपचार ...
गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने भीतिदायक वातावरण तयार झाले होते. त्यानंतर, रुग्णसंख्या वाढत असताना स्थानिकांना संगमनेरातच उपचार मिळावेत, याकरिता संगमनेरचे प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कचेरिया आदींच्या प्रयत्नांतून ग्रामीण रुग्णालयात विशेष कोविड-१९ आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले. त्यासाठी अनेकांनी भरीव मदतदेखील केली. औषधोपचार, कृत्रिम श्वासोच्छ्वास व इतरही वैद्यकीय सुविधा रुग्णांना येथे मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. कोरोनाची लागण झालेल्या हजारो रुग्णांवर येथे उपचार होऊन ते कोरोनामुक्त झाले. मात्र, कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने हे केंद्र बंद करण्यात आले.
परंतु, आता संगमनेर तालुक्यात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. घुलेवाडीतील केंद्र बंद झाल्याने कोरोनाची लागण झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना खासगी रुग्णालयात उपचारांशिवाय कुठला पर्याय नाही. खासगी रुग्णालयांचे बिल सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असून उपचारांनंतर बिल भरण्यासाठी कुटुंबांतील सदस्यांची दमछाक होते आहे. तरी, पुन्हा कोरोना केंद्र सुरू करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.