ऊस तोडणीसाठी एकरी चार हजारांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:27 AM2021-02-27T04:27:41+5:302021-02-27T04:27:41+5:30
चिचोंडी पाटील : नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून ऊसतोड करण्यासाठी एकरी चार हजार रुपयांची मागणी केली ...
चिचोंडी पाटील : नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून ऊसतोड करण्यासाठी एकरी चार हजार रुपयांची मागणी केली जात आहे. मागणी मान्य न केल्यास टोळी मुकादम वेगवेगळी कारणे देऊन, ऊसतोड करण्यास दुसऱ्या गावी जाणार असल्याचे सांगून अडवणूक करत आहेत. त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.
तक्रार केल्यास आपला ऊस तोडला जातोय की नाही, या भीतिपोटी तक्रार करण्याची हिंमतही शेतकरी करत नाहीत. एक प्रकारे तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्याशिवाय शेतकऱ्यांना दुसरा मार्ग उरलेला नाही. वास्तविक ऊसतोड कामगार टोळ्यांना साखर कारखान्यांकडून ठरल्यानुसार मजुरी देण्यात येते, शिवाय उसाचे वाडे ऊसतोड मजुरांनाच मिळतात. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही जनावरांसाठी चारा म्हणून वाढे घ्यायचे झाल्यास ते टोळीकडून विकत घ्यावे लागते. मजुरी व्यतिरिक्त या वाढे विक्रीतूनही अधिकचे पैसे त्यांना मिळतात. याबाबत शेतकरीही कोणत्याच प्रकारे विरोध न करता, वाडे टोळीस स्वाधीन करून रिकामे होतात. आता नवीनच प्रकार सुरू झाल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची गळचेपी होत आहे.
सध्या चिचोंडी पाटील व आसपासच्या गावांसाठी दोन कारखान्यांच्या प्रत्येकी एक अशा दोन ऊसतोड टोळ्या आहेत. त्यामुळेच या दोन टोळ्यांना मागणी वाढत आहे. परिणामी, शेतकऱ्यांकडून पैसे उकळण्यात येत आहेत.
---
मी अर्धा एकर ऊसतोड करण्यासाठी तीन हजार रुपये द्यायला तयार होतो. त्यास टोळी तयार होती. काही रक्कम आगाऊ दिली. रात्रीतून काय झाले माहीत नाही. शेजारचा ऊस तोडणी करून माझा ऊस न तोडता टोळी दुसरीकडे गेली. विचारणा करण्यास गेलो, तर माझे घेतलेले पैसे परत करून ऊसतोड करण्यास नकार दिला.
-काशीनाथ बेल्हेकर,
ऊस ऊत्पादक, चिचोंडी पाटील
---
नगर तालुक्याचा साखर कारखाना पीयूष शुगर या खासगी संस्थेकडे आहे. कारखाना तालुक्यातील ऊस उत्पादकांच्या ताब्यात असता, तर ही समस्या निर्माण झाली नसती. ऊसतोड टोळ्या कारखान्यांर्तगत काम करतात. त्यात टोळी प्रमुख माहिती देताना जादा कोयते सांगून कमी मजुरात काम करून घेतात. त्यातून असे प्रकार होतात. त्यामुळे साखर संचालकांनी यात लक्ष घालणे आवश्यक आहे.
-सुधीर भद्रे,
जिल्हाध्यक्ष, भारतीय जनसंसद