स्मशानभूमीकरिता जागेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:21 AM2021-02-16T04:21:27+5:302021-02-16T04:21:27+5:30
श्रीरामपूर : शहराची वाढती लोकसंख्या आणि विस्तार पाहता मिल्लतनगरजवळ स्मशानभूमी आणि कब्रस्तान तयार करण्याची गरज आहे. त्याकरिता पालिकेने मंजूर ...
श्रीरामपूर : शहराची वाढती लोकसंख्या आणि विस्तार पाहता मिल्लतनगरजवळ स्मशानभूमी आणि कब्रस्तान तयार करण्याची गरज आहे. त्याकरिता पालिकेने मंजूर असलेल्या आरक्षणाच्या जागा संपादनाची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशी मागणी ज्येष्ठ नगरसेवक अंजूम शेख यांनी केली. सोमवारी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांची भेट घेऊन शेख यांनी निवेदन दिले. यावेळी नगरसेवक ताराचंद रणदिवे, राजेंद्र पवार, रज्जाक पठाण, असलम सय्यद, एस.के. खान आदी उपस्थित होते.
शहरातून जाणाऱ्या रेल्वेमार्गामुळे दोन भाग पडले आहेत. उत्तरेच्या भागात झालेल्या नागरी वसाहतीमुळे मूलभूत सोयीसुविधांवर ताण आलेला आहे. येथे हिंदू समाजाकरिता स्मशानभूमी तर मुस्लीम समुदायाकरिता कब्रस्तानची गरज आहे. त्याकरिता मिल्लतनगर येथील साठवण तलावाच्या शेजारी आरक्षण मंजूर झालेले आहे.
पालिकेने या कामांकरिता जागा संपादनाची प्रक्रिया राबविल्यास रामनगर, फातेमा सोसायटी या भागातील नागरिकांना लाभ होईल, असे शेख यांनी म्हटले आहे.
पुढील काळात जर जागेचे दर वाढले तर पालिकेले खरेदीला अडचणी येतील. त्यामुळे लवकरात लवकर कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. नगराध्यक्षा आदिक यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे शेख यांनी सांगितले.