शौचालय स्वच्छतेचा ठेका रद्द करण्याची मागणी : श्रीरामपूर पालिकेची सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 06:16 PM2019-02-28T18:16:54+5:302019-02-28T18:17:31+5:30
शहरात मोठ्या प्रमाणावर वैैयक्तिक शौचालये आहेत. त्यामुळे सार्वजनिक शौचालय स्वच्छतेचा ठेका मागील ठेक्यापेक्षा अधिक दराने देण्याचे कारणच नाही.
श्रीरामपूर : शहरात मोठ्या प्रमाणावर वैैयक्तिक शौचालये आहेत. त्यामुळे सार्वजनिक शौचालय स्वच्छतेचा ठेका मागील ठेक्यापेक्षा अधिक दराने देण्याचे कारणच नाही. तो रद्द करण्यात यावा, अशी मागणी विरोधी नगरसेवकांनी केली.
पालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पालिकेची सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे, मुख्याधिकारी डॉ. बाबुराव बिक्कड उपस्थित होते. प्रारंभी पुलवामा हल्ल्यतील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. लाड समितीच्या शिफारशीनुसार वारसहक्काने कर्मचारी भरतीचा विषय मागील सभेत स्थगित केला होता. या सभेच्या विषयपत्रिकेवर हा विषय आल्याने विरोधकांनी त्यास आक्षेप घेतला. मात्र, सभेत त्यास मंजुरी देण्यात आली.
दैैनंदिन वसुली ठेक्याच्या निविदेवर निर्णय घेण्याचा अधिकार मुक्याधिकाऱ्यांना देण्यात आला. रामनवमी यात्रेत कमी खर्चात जागा देऊन त्याची वाढीव दरात विक्री केली जाते. त्यामुळे जागावाटपाच्या निविदा काढण्याची मागणी यावेळी करण्यात आली. शहरात सुरू असलेल्या काही रस्त्यांच्या व सार्वजनिक शौचालयांच्या विषयावरून मोठी खडाजंगी पहायला मिळाली. दोषी ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी करण्यात आली. नगरसेवक अंजूम शेख यांनी कारवाईची मागणी केली.
या विषयावर श्रीनिवास बिहाणी यांनीही आवाज उठविला. चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ‘बेस्ट आॅफ दी मंथ’ हा पुरस्कार देऊन गौरविण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. आठवड्यातून दोनदा कोरडा दिवस पाळला जात असताना पाणीपुरवठ्याच्या वेळेत कपात केली. त्यामुळे काही लोकांना कमी पाणी मिळत असल्याची तक्रारही करण्यात आली. अवैैध नळजोड व पाण्याच्या टाक्यांतून वाया जाणाºया पाण्यावरही सभेत चर्चा झडली. त्यावर नगराध्यक्षा आदिक यांनी कडक कारवाईच्या सूचना दिल्या.