भाजपाने नगरमधील पाडापाडीचा वस्तुनिष्ठ अहवाल मागविला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2019 06:35 AM2019-12-28T06:35:13+5:302019-12-28T06:35:44+5:30
मुंबई येथील बैठकीत निर्णय : भाजपच्या पराभूत आमदारांनी केले विखेंना लक्ष्य
अहमदनगर : भाजपच्या पराभूत आमदारांनी विखेंविरोधात केलेल्या तक्रारींवर दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचा आदेश शुक्रवारी दिला. भाजपचे पक्ष संघटक विजय पुराणिक हे भाजपच्या नगर जिल्ह्यातील पाडापाडीचा अहवाल श्रेष्ठींना सादर करणार आहेत. अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असे माजी मंत्री राम शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यातील पराभवाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक झाली. बैठकीस माजी मंत्री राधाकृष्ण विखे, खासदार डॉ. सुजय विखे, आशिष शेलार, आमदार बबनराव पाचपुते, मोनिका राजळे, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले हे प्रमुख नेते उपस्थित होते. बैठकीनंतर राम शिंदे यांनी माध्यमांसमोर भूमिका मांडली. ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यातील भाजपचे पराभूत आमदार आणि विखे हे प्रथमच एकत्र आले. विरोधी पक्षनेत्यांनी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतले. निर्णय घेण्यापूर्वी त्यांनी नगर जिल्ह्यातील बाराही मतदारसंघात काय घडले. भाजपच्या उमेदवारांच्या पराभवाची कारणे काय आहेत, याचा अभ्यास करून वस्तुनिष्ठ अहवाल मागविला आहे.
विखेंनी मांडली बाजू
नाशिक येथील बैठकीनंतर नगर जिल्ह्यातील पराभूत आमदार व विखे पिता-पुत्र हे मुंबई येथील बैठकीत प्रथमच एकत्र आले. या बैठकीतही जिल्ह्यातील भाजपाच्या आजी-माजी आमदारांनी विखे यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली. विखे यांनीदेखील आपली बाजू जोरकसपणे मांडल्याचे समजते. पराभूत आमदार व विखे, अशा दोन्ही बाजूंचे म्हणणे फडणवीस यांनी ऐकून घेतले.