मोदी सरकारकडून लोकशाही पायदळी : अण्णा हजारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 10:35 AM2019-01-17T10:35:36+5:302019-01-17T10:36:31+5:30
लोकपाल, लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी करण्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार गेल्या साडेचार वर्षांपासून दुर्लक्ष करीत आहे.
राळेगणसिद्धी : लोकपाल, लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी करण्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार गेल्या साडेचार वर्षांपासून दुर्लक्ष करीत आहे. सर्वोच्च न्यायालय, लोकसभा, राज्यसभा अशा संवैधानिक संस्थांच्या निर्णयाचे पालनही ते करीत नाहीत. त्यामुळे या सरकारची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू आहे. हा लोकशाहीसाठी मोठा धोका आहे, अशा तीव्र शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारवर टीका केली.
अण्णा हजारे हे महात्मा गांधी पुण्यतिथीपासून (३० जानेवारी )लोकपाल, लोकायुक्त कायदा, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावेत यासाठी राळेगणसिद्धी येथे उपोषण करणार आहेत. या पार्श्वभूमीवर हजारे यांनी पंतप्रधान मोदी यांना बुधवारी पत्र पाठवून आपल्या भावना तीव्र शब्दात व्यक्त केल्या. हजारे यांनी पत्रात म्हटले आहे की, देशात वाढत्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी २०११ साली कोट्यवधी जनता रस्त्यावर उतरली. त्यानंतरही वेळोवेळी आंदोलनानंतर २० डिसेंबर २०१३ रोजी लोकपाल,लोकायुक्त कायदा मंजूर झाला. भाजपचे सरकार केंद्रात मे २०१४ मध्ये सत्तेत आले. त्यानंतर लोकपाल, लोकायुक्त कायद्याची तत्काळ अंमलबजावणी गरजेची होती. २०१९ मध्ये केंद्र सरकारला सत्तेत येऊन पाच वर्षांचा कालावधी पूर्ण होण्याची वेळ आली.
तरीही या कायद्याची अंमलबजावणी झालेली नाही. सर्वोच्च न्यायालयाने फटकारले तरीही सरकार लोकपाल, लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी करायला तयार नाही. सर्वोच्च न्यायालयासारख्या संविधानिक संस्थांच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करणारे सरकार हे लोकशाही सरकार आहे काय?असा प्रश्न उपस्थित
होतो.
आपले सरकार महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल यांना मानते. परंतु या महान नेत्यांनी सत्याचा जीवनात अंगीकार केला होता, त्या सत्याकडे दुर्लक्ष करून केंद्र सरकारची वाटचाल सुरू आहे. सरकारने वेळोवेळी खोटे बोलणे सहन होऊ शकत नाही. त्यामुळे, महात्मा गांधी पुण्यतिथीपासून राळेगणसिद्धी येथे उपोषण आंदोलन करणार आहे, असे हजारे यांनी पत्रात म्हटले आहे.
लोकपाल,लोकायुक्त कायद्याच्या अंमलबजावणीचे मतदारांना दिलेले आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाळले नाही. सत्तेत येण्यापूर्वी मोदी हे समाज व देशाची सेवा करतील असे वाटत होते. परंतु, देशासाठी खरा नेता मिळाला नाही. सत्तेसाठी सत्य सोडण्यामुळे माझा मोदी यांच्या नेतृत्वावरील विश्वास उडाला आहे. - अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक