जि़ प क़र्मचाऱ्यांची निदर्शने
By Admin | Published: August 27, 2014 10:58 PM2014-08-27T22:58:51+5:302014-08-27T23:09:02+5:30
अहमदनगर : जिल्हा परिषद कर्मचारी युनियन व राज्य कास्ट्राईब कर्मचारी संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली़
अहमदनगर : जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी प्रदीप भोगले यांना जिल्हा परिषदेचे सदस्य परमवीर पांडुळे यांनी दमबाजी व शिवीगाळ प्रकरणाचा निषेध करण्यासाठी आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी, या मागणीसाठी जिल्हा परिषद कर्मचारी युनियन व राज्य कास्ट्राईब कर्मचारी संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली़
दलित वस्ती सुधार योजनेच्या काम वाटपात अन्याय झाल्याची तक्रार करीत जि़प़ सदस्य पांडुळे यांचा जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी प्रदीप भोगले यांच्याशी मंगळवारी (दि़२६) दुपारी वाद झाला होता़ त्यामुळे जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल लंघे यांना निवेदन देऊन पांडुळे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली़ त्यानंतर दुपारी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या आवारात निदर्शने करीत पांडुळे यांचा निषेध नोंदविला़ तसेच या घटनेच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून बुधवारी काम केले़ याबाबत लंघे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पांडुळे यांनी मंगळवारी समाज कल्याण अधिकाऱ्यांच्या दालनात येऊन दमबाजी व शिवीगाळ केली़ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गलिच्छ आरोप करीत शासकीय कामात अडथळा आणला़ त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली असून, याप्रकरणाची चौकशी करुन पांडुळे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे़ यावेळी विजय कोरडे, शशिकांत रासकर, अशोक काळापहाड, रवि भिंगारदिवे, राजू जरे, शिवाजी शिंदे, राजेंद्र थोरात, किशोर सोनवणे, संजय गोसावी, सुहास गोबरे, सुनील सरोदे, सुनील जाधव आदी उपस्थित होते़
राज्य कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद जगताप यांना निवेदन देऊन परमवीर पांडुळे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली़ यावेळी महासंघाचे गुणवंत खुरंगळे, हर्षवर्धन सोनवणे, बाळासाहेब धनवे, बी़ के़ घोडेराव, किशोर उजागरे, बाळासाहेब गायकवाड, पोपट जाधव, सुनील शिंदे आदी उपस्थित होते़(प्रतिनिधी)