लखमापुरीत डेंग्यूसदृश साथ
By Admin | Published: September 14, 2014 11:08 PM2014-09-14T23:08:02+5:302024-03-26T14:20:48+5:30
शेवगाव : तालुक्याच्या पूर्व भागातील लखमापुरी भागात दोन दिवसात डेंग्यूसदृश आजाराचे तीन रुग्ण आढळून आले.
शेवगाव : तालुक्याच्या पूर्व भागातील लखमापुरी भागात दोन दिवसात डेंग्यूसदृश आजाराचे तीन रुग्ण आढळून आले. गेल्या आठवड्यात दहिगाव-शे येथील एक महिला स्वाईन फ्ल्यूची बळी ठरली. साथीच्या आजाराने डोके वर काढल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
गेल्या आठवड्यात लखमापुरी परिसरातील दहिगाव-शे येथील लताबाई कचरु दुबे (वय ४२) ही महिला स्वाईन फ्ल्यूच्या आजाराची बळी ठरली. आता याच परिसरातील लखमापुरी येथे गेल्या चार दिवसांपासून डेंग्यूसदृश साथीच्या आजाराने चाहूल दिली आहे.
एकास नगरला हलविले
बलभीम विश्वनाथ गावंडे (वय ५०), संगीता अनिल मातंग (वय ३५) पद्मा शेषराव गावंडे (वय ४०) यांच्यासह आणखी काही जणांना ताप, ढाळ, उलट्या असा त्रास सुरु झाल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. यापैकी विश्वनाथ गावंडे यांना पुढील उपचारासाठी नगरला हलविण्यात आले आहे.
पाण्याचा टँकर बंद
लखमापुरी गावात पिण्याच्या पाण्यासाठी सुरु असलेला टँकर गेल्या पंधरा दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे साठवण बंधाऱ्यातील दूषित पाणी पिण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. हे दूषित पाणी तसेच डासांचा वाढता प्रादुर्भाव यामुळे साथ पसरली आहे. आरोग्य विभागाला माहिती देऊनही गांभीर्याने दखल घेण्यात आली नाही, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत.
कर्मचाऱ्यांकडून सर्वेक्षण
याबाबत काही कर्मचाऱ्यांना सर्वेक्षणासाठी गावात पाठविले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सोमवारी आम्ही तेथे भेट देऊ, असे संबंधित अधिकाऱ्याने ‘लोकमत’ ला सांगितले. साथरोग तात्काळ आटोक्यात आणृून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
(तालुका प्रतिनिधी)
दक्षतेच्या सूचना
लखमापुरी येथे डेंग्यूसदृश साथीबाबत तातडीने हालचाली करण्याच्या सुचना चापडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पानसरे यांना दिल्या असून त्यांनी घरसर्वेक्षण मोहीम हाती घेतली आहे. पुरेसा औषध साठाही उपलब्ध करुन देण्यात आला आहे. सोमवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकासह गावाला भेट देऊन तातडीची उपचार सेवाही उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
डॉ. चंद्रकांत परदेशी
प्रभारी तालुका
आरोग्याधिकारी, शेवगाव