संगमनेर उपविभागातील ७१ जणांवर हद्दपारीची कारवाई
By शेखर पानसरे | Updated: June 24, 2023 11:21 IST2023-06-24T11:20:32+5:302023-06-24T11:21:05+5:30
सोमनाथ वाघचौरे : आगामी काळात विविध सण, उत्सव

संगमनेर उपविभागातील ७१ जणांवर हद्दपारीची कारवाई
शेखर पानसरे, लोकमत न्यूज नेटवर्क, संगमनेर (अहमदनगर) : संगमनेर उपविभागातील विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असलेल्या ७१ जणांवर सीआरपीसी १४४ (दोन) अन्वये कारवाई करण्यात आली असून त्यांना ठरावीक कालावधीकरिता हद्दपार करण्यात आले आहे. अगामी सण, उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केल्याची माहिती संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.
आगामी काळात विविध सण, उत्सव साजरे केले जाणार आहेत. त्या कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता पोलीस ठाणे अभिलेखावरील गुन्हेगार तसेच सार्वजनिक सण, उत्सवादरम्यान गुन्हे दाखल असलेल्यांमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. सण, उत्सव शांततेत पार पाडावे. त्या काळात कायदा व सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न निर्माण होणार नाही, यासाठी कारवाई करण्यात आली. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येईल. संगमनेर शहर, संगमनेर तालुका त्याचप्रमाणे अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते. त्यानुसार ७१ जणांना संगमनेर आणि अकोले तालुक्यांच्या हद्दीत प्रवेश करण्यास मनाई केली आहे. यातील व्यक्ती पुन्हा हद्दीमध्ये मिळून आल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील. असेही उपविभागीय पोलिस अधिकारी वाघचौरे यांनी सांगितले.