पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:17 AM2021-05-28T04:17:22+5:302021-05-28T04:17:22+5:30
अहमदनगर: गतवर्षीच्या खरीप हंगामातील पिकांचा शेतकऱ्यांनी विमा उतरविला. पिकांचे मोठे नुकसान झाले. परंत, पीकविमा कंपनीने वर्षे उलटूनही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई ...
अहमदनगर: गतवर्षीच्या खरीप हंगामातील पिकांचा शेतकऱ्यांनी विमा उतरविला. पिकांचे मोठे नुकसान झाले. परंत, पीकविमा कंपनीने वर्षे उलटूनही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली नसून, ही रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी, अशी मागणी शेतकरी मराठा महासंघाचे अध्यक्ष संभाजी दहातोंडे केली केली आहे.
दहातोंडे यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, नगर जिल्ह्यात गेल्या वर्षी खरीप हंगामात सातत्याने होणारा पाऊस, नैसर्गिक संकटे व अन्य कारणाने शेतपिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. सरकारी पातळीवर केलेल्या आवाहनानुसार ४ लाख ६६ हजार २४५ शेतकऱ्यांनी २ लाख ५९ हजार ४४८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरविण्यात आला होता. त्यासाठी १४८ कोटी ६१ लाख रुपये भरले. त्यातून ७४५ कोटी रुपये संरक्षित झाल्याचे सांगितले जाते. पीकविमा भरून एक वर्षांचा कालावधी उलटून गेला. सध्या खरिपाची तयारी सुरू आहे. अशा काळात शेतकऱ्यांना पैसे मिळाल्यास मोठा आधार होईल. इतर जिल्ह्यात नुकसानभरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली गेली. परंतु, नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्याप विम्याची रक्कम मिळालेली नाही. याबाबत जिल्हा कृषी अधीक्षकांकडे विचारणा केली असता ते याबाबत बोलण्यास टाळाटाळ करत आहेत. कृषिमंत्र्यांची भेट घेऊन जिल्ह्यातील पीक विम्याबाबतची वस्तुस्थिती त्यांच्यासमोर मांडणार आहे. तसेच मुख्यमंत्र्यांचेही याकडे लक्ष वेधणार असल्याचे दहातोंडे यांनी निवेदनात म्हटले आहे.