अतिवृष्टीचे अनुदान आठ दिवसात खात्यावर जमा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:21 AM2021-03-27T04:21:12+5:302021-03-27T04:21:12+5:30
करंजी : २०२० साली अतिवृष्टीने पाथर्डी तालुक्यातील शेतीचे व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तालुक्यात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ...
करंजी : २०२० साली अतिवृष्टीने पाथर्डी तालुक्यातील शेतीचे व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तालुक्यात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मागील महिन्यातच अनुदानाची रक्कम जाहीर केली होती. अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली नाही. तरी आठ दिवसात अनुदान जमा करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
२०२० साली पाथर्डी तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती. अतिपावसामुळे तालुक्यात शेतकऱ्यांची पिके वाया गेली होती. तालुक्याच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात असलेल्या फळबागांचे मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी आलेल्या अस्मानी संकटामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. शासनाने या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. मागील महिन्यात त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने अनुदान जाहीर केले; मात्र अनुदान अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले नाही, असा प्रश्न नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे.
पाथर्डी तालुक्यातील ९८ गावातील शेतकऱ्यांना ४ कोटी रुपये अनुदानाची रक्कम वाटपासाठी शेतकऱ्यांच्या पंचनाम्याच्या याद्या जमा करून महिना होत आला तरी अद्याप शेतकऱ्यांचे अनुदान अद्याप जमा झाले नाही. मार्च महिन्याच्या अखेरीस हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे, अशी मागणी सोसायटीचे अध्यक्ष बंडू अकोलकर, ग्रा. पं. सदस्य नवनाथ आरोळे, रोहित अकोलकर, राजेंद्र अकोलकर, राहुल अकोलकर, महादेव नजन, आसाराम अकोलकर, बबन अकोलकर, रावसाहेब क्षीरसागर, विक्रम अकोलकर, संभाजी अकोलकर आदींसह शेतकऱ्यांनी केली आहे.
--
मागील वर्षी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान मंजूर होऊन महिना होत आला तरी अद्याप अनुदान शेतकऱ्यांना का मिळाले नाही याची चौकशी होऊन आठ दिवसात शेतकऱ्यांना अनुदान मिळावे.
-नवनाथ आरोळे,
सदस्य, ग्रा. पं., करंजी
--
अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे अनुदान त्या-त्या बँकांकडे पाठविले आहे. येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होईल.
-शाम वाडकर,
तहसीलदार, पाथर्डी