जिल्हा परिषदेत वर्षानुवर्षे प्रतिनियुक्त्यांची खैरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 12:54 PM2019-06-25T12:54:26+5:302019-06-25T12:54:31+5:30
जिल्हा परिषदेमध्ये दरवर्षीप्रमाणे बदल्यांची प्रक्रिया पार पडली़ त्यामध्ये प्रशासकीय कारण दाखवत मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी अनेक कर्मचाऱ्यांच्या गैरसोयीने बदल्या केल्या आहेत़
अहमदनगर : जिल्हा परिषदेमध्ये दरवर्षीप्रमाणे बदल्यांची प्रक्रिया पार पडली़ त्यामध्ये प्रशासकीय कारण दाखवत मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी अनेक कर्मचाऱ्यांच्या गैरसोयीने बदल्या केल्या आहेत़ मात्र वर्षानुवर्षे प्रतिनियुक्तीवर काम करत असलेले कर्मचारी प्रशासनाच्या आशीर्वादाने त्यांच्या सोयीच्या ठिकाणी ठाण मांडून आहेत़
जिल्हा परिषदेत दरवर्षी मे महिन्यात प्रशासकीय व विनंती बदल्याची प्रक्रिया पार पाडली जाते़ यात काही कर्मचाºयांची सोय होते, तर अनेक कर्मचाºयांना गैरसोयीने बदलीवर जावे लागते़ बदलीबाबत शासनाचाच आदेश असल्याने आम्हाला बदल्या कराव्या लागतात, असे कारण प्रशासन देते़ जिल्हा परिषदेत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काही कर्मचारी मात्र बदलीनंतरही त्यांना सोयीच्या असलेल्या ठिकाणीच काम करतात़ संबंधित विभागाचे प्रमुख अशा कर्मचाºयांना प्रशासकीय सोय, असे कारण देत पाठीशी घालतात़ काही कर्मचारी वर्षानुवर्षे आपल्या बदलीच्या ठिकाणी काम न करता त्यांना हव्या असलेल्या ठिकाणी ठाण मांडून आहेत़ जिल्हा परिषद मुख्यालयामध्ये अशी संख्या मोठी आहे़ मुख्यकार्यकारी अधिकारी विश्वजित माने यांनी पदाधिकारी व कर्मचारी संघटनांची विनंती डावलून प्रशासकीय बदल्या केल्या आहेत़ माने आता प्रतिनियुक्तीवर असलेल्या कर्मचाºयांची उचलबांगडी करणार का ,याबाबत उत्सुकता आहे़ अनेक जिल्हा परिषद सदस्यांनी ही माहिती काढायला सुरुवात केली असून, याबाबत जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ होण्याची शक्यता आहे़ या प्रतिनियुक्त्यांना संमती कोण देते व काही ठराविक कर्मचारीच प्रतिनियुक्तीसाठी पात्र कसे ठरतात, असाही मुद्दा उपस्थित झाला आहे़ काही खातेप्रमुख आर्थिक देवघेव करून प्रतिनियुक्त्यांना मूक संमती देतात, असाही संशय आहे़ प्रतिनियुक्त्यांच्या आदेशातून यातील मोठे गौडबंगाल समोर येण्याची चिन्हे आहेत़
शिक्षकांच्या बदल्यांमध्येही मोठ्याप्रमाणात गैरसोय
शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू आहे़ त्यातही अनेक कर्मचा-यांच्या बदल्या गैरसोयीच्या झाल्या आहेत़ वर्षानुवर्षे प्रयत्न करून पती-पत्नी एकत्रिकरणात एकत्र आलेल्या शिक्षकांच्या पुन्हा गैरसोयीने बदल्या झाल्या आहेत़ त्यामुळे पती-पत्नी एकत्रिकरण हा आदेश निव्वळ कागदावर उरला आहे़ यातील काही बदल्या मात्र आश्चर्यकारकपणे सोयीने झाल्या असून, त्यातील काही अधिका-यांच्या नातेवाईकांचा समावेश असल्याची चर्चा आहे़