नगरमधून वंचित बहुजन आघाडीकडून घनश्याम शेलार रिंगणात ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 01:08 PM2019-03-14T13:08:35+5:302019-03-14T13:09:45+5:30
काँग्रेससोबत आघाडीची चर्चा फिस्कटल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने राज्यातील ४८ मतदारसंघातून उमेदवार देण्याचे स्पष्ट केले असून,
अहमदनगर : काँग्रेससोबत आघाडीची चर्चा फिस्कटल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने राज्यातील ४८ मतदारसंघातून उमेदवार देण्याचे स्पष्ट केले असून, येत्या दोन दिवसांत अहमदनगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात येणार आहे़ नगरमधून घनश्याम शेलार यांच्या नावाची चर्चा आहे़़ शेलार यांनी मात्र कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेतो असे आघाडीतील नेत्यांना कळविले आहे़
लोकसभा निवडणुकीत सध्या प्रस्थापित पक्षांसह अॅड़ प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी चर्चेत आहे़ राज्यातील २२ लोकसभा मतदारसंघातून आघाडीने उमेदवार घोषित केले आहेत़ उर्वरित २६ जागांवरील उमेदवारांची यादी शुक्रवारी (दि़१५) जाहीर करण्यात येणार असल्याचे आघाडीचे राज्याचे प्रचारप्रमुख प्रा़ किसन चव्हाण यांनी सांगितले़ नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात घनश्याम शेलार यांच्याशी आघाडीतील नेत्यांनी संपर्क केला आहे़ धनगर आरक्षणासाठी लढा देणारे डॉ़ इंद्रकुमार भिसे यांनीही उमेदवारी देण्याची मागणी केली आहे़ लोकाधिकार आंदोलनाचे अॅड़ अरुण जाधव, सुधाकर आव्हाड, शिवाजी आढाव यांचीही नावे चर्चेत आहेत़ आपणही उमेदवारी करण्यास तयार असल्याचे चव्हाण म्हणाले.
शिर्डी लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडून अॅड़ संतोष गायकवाड, पप्पू बनसोडे, गणेश बोराडे हे इच्छुक आहेत़ या दोन्ही मतदारसंघातील इच्छुकांची गुरुवारी (दि़१४) नगर येथे बैठक होणार आहे़ त्यानंतर इच्छुकांची नावे कोअर कमिटीकडे पाठविण्यात येणार आहेत.
शिर्डी लोकसभा मतदारसंघातून भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सहसचिव अॅड़ कॉ. बन्सी सातपुते यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे़ सातपुते यांना कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी गुरूवारी चर्चेसाठी बोलविले आहे. कॉंग्रेस भवनमध्ये ती बैठक होणार आहे. कॉंग्रेस हा मतदारसंघ भाकपला सोडेल का? ही उत्सुकता आहे. दक्षिणेतून कॉ़ शंकर न्यालपेल्ली तर अॅड़ सुधीर टोकेकर यांच्या नावाची चर्चा आहे़ येत्या दोन दिवसात भाकपचा दक्षिणेतील उमेदवार जाहीर करण्यात येणार असल्याचे भाकपचे ज्येष्ठ नेते कॉ़ बाबा आरगडे यांनी सांगितले़