उपमुख्यमंत्र्यांकडून आमदार लंके यांचे कौतुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:21 AM2021-05-12T04:21:10+5:302021-05-12T04:21:10+5:30
टाकळी धोकेश्वर : रुग्णांची सेवा करतोय, यात आनंद आहे. सकाळपासून दहा वेळा तुझा व्हिडिओ पाहिलाय. हवी तेवढी काळजी तू ...
टाकळी धोकेश्वर : रुग्णांची सेवा करतोय, यात आनंद आहे. सकाळपासून दहा वेळा तुझा व्हिडिओ पाहिलाय. हवी तेवढी काळजी तू घेत नाहीस. तुझे तुझ्या जनतेवर प्रेम आहे, हे मान्य. मात्र, त्यांची काळजी घेताना तुझीही काळजी घे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगर- पारनेरचे आमदार नीलेश लंके यांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त करीत काळजी घेण्याचा सल्ला दिला, तसेच लंके यांच्या कामाचे कौतुकही केले.
भाळवणी येथे शरदचंद्र पवार आरोग्य मंदिराच्या माध्यमातून आमदार लंके यांनी सुरू असलेल्या कामाचे राज्यभर कौतुक होत आहे. आमदार लंके यांच्या नेतृत्वाखालील १ हजार १०० बेडचे कोविड सेंटर सुरू आहेे. लंके यांच्या कोविड सेंटरबाबत उपमुख्यमंत्री पवार यांना पूर्वीच कल्पना होती. आमदार लंके हे रुग्णांची सेवा करताना स्वत:ची फार काळजी घेत नाहीत, असे पवार यांनी व्हिडिओमध्ये पाहिले अन् थेट लंके यांनाच फोन केला.
मंगळवारी सकाळी ८ वाजताच आमदार लंके यांचा फोन वाजला. समोरून आवाज आला, ‘अजित पवार बोलतोय. रुग्णांची सेवा करतोय, यात आनंद आहे. मात्र, फिजिकल अंतर, मास्क, हॅण्डग्लोज, सॅनिटायझर आदींच्या वापराकडं तुझं दुर्लक्ष होतंय. त्याकडं लक्ष देत जा. तुझ्या जनतेसाठी तुझं आरोग्य ठणठणीत असलं पाहिजे, असा सल्ला पवार यांनी दिला.’ त्यावर आपण काळजी घेत असल्याचे आमदार लंके यांनी सांगून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. ते ऐकताच पवार म्हणाले, ‘कशाचे काय, सकाळपासून दहा वेळा तुझा व्हिडिओ पाहिलाय. तू काळजी घेत नाहीस. तुझ्या जनतेची काळजी घेताना स्वत:चीही काळजी घे’, असा सल्ला देत काही मदत लागल्यास सांग, असे म्हणत पवार यांनी आमदार लंके यांचा निरोप घेतला.
.......................
जयंत पाटील यांचाही फोन
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही आमदार लंके यांच्याशी संपर्क करून ‘राज्यभर गाजताय तुम्ही’ असेे सांगत आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला. ‘कोविड सेेंटर यशस्वीपणे सुरू आहे. भविष्यातही सुरू राहील. मात्र, तुम्ही रुग्णांच्या संपर्कात जाऊ नका, कोणी विचारले तर जयंत पाटलांनी सांगितलंय, असं सांगा, असे सांगत पाटील यांनीही आमदार लंके यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला.