कोण संजय राऊत?, नाना पटोले बोलघेवडे; देवेंद्र फडणवीसांचे एका दगडात दोन पक्षी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2023 01:56 PM2023-05-26T13:56:21+5:302023-05-26T13:56:27+5:30
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्यावर बोचरी टीका केली.
अहमदनगर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहमदनगर दौऱ्यावर आहेत. महाविकास आघाडीमध्ये सध्या लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला ठरविण्याची चर्चा सुरु झाली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सातत्याने राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करत असतात. त्यांच्यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोलेंसह विरोधकांवर टीकास्त्र सोडले. ते अहमदनगर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. संजय राऊत आणि नाना पटोले हे बोलघेवडे असून आम्हाला खूप काम आहे, त्यामुळे त्यांना उत्तर देत नाही अशी टीका फडणवीसांनी केली.
मंत्रिमंडाचा विस्तार झाल्यानंतर राज्यातील सरकार पडेल, असं कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं होतं. यावर बोलताना फडणवीसांनी एका दगडात दोन पक्षांवर अर्थात राऊत आणि पटोलेंवर निशाणा साधला. मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याचे फडणवीसांनी स्पष्ट केले. "शिवसेना-भाजपमध्ये समन्वय असून आमच्यात कोणतीही अडचण नाही. गजानन कीर्तीकर यांनी २२ जागांवर दावा केला नसून आमच्या युतीत कोणतेही मतभेद नाहीत", असंही त्यांनी म्हटलं. तर संजय राऊतांच्या प्रश्नावर बोलताना 'कोण संजय राऊत?' अशा शब्दांत फडणवीसांनी बोचरी टीका केली.
फडणवीसांचे एका दगडात दोन पक्षी
युतीत कोणतेही वाद नसून जरी असले तरी चहाच्या कपाएवढे आणि ते शमले आहेत. तसेच महाविकास आघाडीमध्ये काहीही झालं तरी त्याचं खापर भाजपवर फोडलं जातं, इतरांच्या घरी मुलगा झाला तरी त्यात आमचा हात आहे असं म्हणू नये म्हणजे झालं, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
देवेंद्र फडणवीस शुक्रवारी अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर आलेले आहेत. फडणवीस यांच्या हस्ते शासकीय विश्रामगृहाच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन समारंभ झाला. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. या आढावा बैठकीनंतर फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व भाजप आमदार राम शिंदे यांच्यामधील वादावर बोलताना फडणवीस म्हणाले, दोघांमधील वाद एका पेल्यातील वाद आहे. तो आता थांबलेला आहे. तो किरकोळ वाद होता. मी दोघांमध्ये मध्यस्थी घडवून आणली आहे. त्यामुळे तो वाद पूर्णपणे मिटलेला आहे.
शिवसेना व भाजप या दोघांमध्ये कोणतेही वाद नाहीत. आमच्यामध्ये पूर्ण समन्वय आहे. लोकसभेच्या जागा वाटपाबाबत आम्ही दोघं बसून निर्णय घेऊ. नगर जिल्ह्यातील जलजीवन घोटाळ्याबाबत मला पूर्ण माहिती नाही. तरीपण आम्ही त्याची माहिती घेऊन चौकशी करू, असं फडणवीस यांनी सांगितले.