उपमहापौरांचे सोफे पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 10:42 AM2018-06-13T10:42:09+5:302018-06-13T10:42:18+5:30
महापालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या दालनातील फर्निचरचे १५ लाख रुपयांचे बिल पाठपुरावा करूनही न मिळाल्याने एका ठेकेदाराने मंगळवारी उपमहापौर अनिल बोरुडे यांच्या दालनातील सोफे पळविले.
अहमदनगर : महापालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या दालनातील फर्निचरचे १५ लाख रुपयांचे बिल पाठपुरावा करूनही न मिळाल्याने एका ठेकेदाराने मंगळवारी उपमहापौर अनिल बोरुडे यांच्या दालनातील सोफे पळविले. अन्य पदाधिकाºयांच्या दालनातील सोफेही घेऊन जाण्याचा इशारा ठेकेदारांनी दिला आहे.
महापालिकेत महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्ष नेते, स्थायी समितीचे सभापती, महिला व बालकल्याण समितीचे सभापती असे पाच पदाधिकारी आहेत. त्यांच्या दालनात, अॅन्टी चेंबरमध्ये आणि स्वीय सहायकांच्या दालनात सोफे, खुर्च्या देण्यात आल्या आहेत. संबंधित दालनातील पदाधिकारी पुरवठादाराला थेट आॅर्डर देऊन फर्निचर, सोफे मागवून घेतात. नंतर त्यांचे बिल लेखा विभागाकडे पाठविले जाते. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून पाठपुरावा करूनही बिल न मिळाल्याने एका ठेकेदाराने चक्क उपमहापौर अनिल बोरुडे यांच्या दालनातील सोफे, खुर्च्या पळवून नेल्या. ठेकेदारांनी दालनातील सोफे बाहेर आणून ठेवले. स्थायी समितीच्या सभापतीच्या दालनातील सोफाही पळविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र सभापतींनी त्यास अटकाव केला. या प्रकाराने महापालिकेत एकच खळबळ उडाली. तब्बल तासभर महापालिकेत गोंधळ सुरू होता. अन्य पदाधिकाºयांच्या दालनातील सोफेही घेऊन जाण्याचा इशारा ठेकेदारांनी दिला आहे. महापालिकेत इरफान शेख व पार्टी यांनी सोफे पुरविले आहेत. त्यांचे पैसे थकल्याने त्यांनी सोफे ताब्यात घेतले. प्रशासनाच्या एकाही अधिकाºयाने या प्रकाराला अटकाव केला नाही. दरम्यान शहर अभियंता, शाखा अभियंता यांनी मात्र कानावर हात ठेवणेच पसंत केले. दरम्यान प्रशासनाधिकाºयांनी ही बाब जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांच्या कानावर घातली. त्यांनी तत्काळ गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. मात्र सायंकाळपर्यंत कोणतीही तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाली नव्हती.