रांजण झाले हद्दपार, आले पॅकबंद पाणी

By Admin | Published: April 26, 2016 11:13 PM2016-04-26T23:13:08+5:302016-04-26T23:23:47+5:30

अहमदनगर : उन्हाळा आला की, एका छताखाली काळाकुट्ट रांजण... त्यावर लाकडी झाकण आणि भडक लाल रंगाचे कापड... पाणी पिण्यासाठी रंगीबेरंगी प्लास्टिकचे ग्लास.., अशी पाणपोई दिसली की पाणी पिण्याचा मोह व्हायचा.

The deserted exile, ginger-packaged water | रांजण झाले हद्दपार, आले पॅकबंद पाणी

रांजण झाले हद्दपार, आले पॅकबंद पाणी

अहमदनगर : उन्हाळा आला की, एका छताखाली काळाकुट्ट रांजण... त्यावर लाकडी झाकण आणि भडक लाल रंगाचे कापड... पाणी पिण्यासाठी रंगीबेरंगी प्लास्टिकचे ग्लास.., अशी पाणपोई दिसली की पाणी पिण्याचा मोह व्हायचा. तहान भागविणाऱ्या पाणपोई चोहीकडे दिसायच्या. यंदाच्या उन्हाळ््यात किरकोळ अपवाद वगळले तर जुन्या स्वरुपाच्या पाणपोई कालबाह्य झाल्याच्या दिसत आहेत. रांजण किंवा माठाची जागा आता ‘जार’ने घेतली आहे. स्वखर्चातून तरुणांनी पाणपोईसाठी थंड पाण्याचे ‘जार’ आणि पाणी पिण्यासाठी ‘यूज अ‍ॅण्ड थ्रो’चे ग्लास ठेवलेले आढळून येत आहेत. पिण्याच्या पाण्याच्या विकतच्या बाटल्यांचे प्रमाण वाढल्याने पाणपोर्इंची संख्याही कमी झाली आहे.
ग्रामीण भागातील लोक पूर्वी भाकरी बांधून घ्यायचे, मात्र पाणी सोबत घेण्याची सोय नव्हती. त्यामुळे रस्त्याने जात असताना जागोजागी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी लागायची. त्यात उन्हाळा म्हटले की, थंड पाण्याची ‘आस’ प्रत्येकालाच असते. लाल किंवा हिरव्या रंगाच्या मंडपाखाली, तसेच झाडाखाली रस्त्यावर पाणपोई थाटलेल्या असायच्या. लाल भडक रंगाचे ओले कापड मनाला थंडावा आणि उत्साह देवून जायचे. रांजणामधील नैसर्गिक पद्धतीने थंड झालेले पाणी पिले की तहान भागायची. काही ठिकाणी मोठा माठ घर, कार्यालयाच्या बाहेर ठेवला जायचा. उन्हाळा आला की पाणपोर्इंचे उद्घाटन करण्याची कार्यकर्त्यांची घाई असायची. यंदाच्या उन्हाळ््यात मात्र पाणपोई बदलली असल्याचे चित्र नजरेस पडते आहे.
सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली असली तरी ते पाणी शुद्ध आहे, यावर नागरिकांचा अजून तरी विश्वास नाही. त्यामुळे प्रत्येक जण विकतचे ‘बाटलीबंद’ पाणी घेवूनच तहान भागवितो. त्यामुळे यंदा पाणपोर्इंची संख्या घटलेली आहे. त्यात आणखी एक बदल दिसला. रांजण आणि माठाची जागा ‘जार’ने घेतली आहे. अनेक सामाजिक, राजकीय संघटनांचे तरुण कार्यकर्ते वर्गणी गोळा करून ‘जार’ची व्यवस्था करीत आहेत. एकाचवेळी चार ते पाच ‘जार’ ठेवले जात आहेत. त्यातील पाणी संपले की दुसऱ्या ‘जार’ची व्यवस्था केली जात आहे. ‘जार’मधील थंड आणि शुद्ध पाणी पिण्यासाठी नागरिकांचाही प्रतिसाद मिळत आहे. ‘जार’मधील पाणी बराचवेळ थंड राहते. पाणी पिण्यासाठी ‘यूज अ‍ॅण्ड थ्रो’ ग्लासचा वापर केला जात आहे. त्यामुळे ग्लास अस्वच्छ राहण्याचा प्रश्न येत नाही. नागरिकांचीही या ‘जार पाणपोई’मुळे तहान भागली जात आहे.
(प्रतिनिधी)
‘जार’मध्ये पाणी देण्यामध्ये स्वच्छता आणि शुद्धता पाहिली आहे. रांजण धुतले जात नाहीत. तसेच त्यामध्ये कीडे पडण्याची शक्यता असते. स्वच्छतेचा मुद्दा सर्वांत जास्त महत्त्वाचा आहे. त्यामुळे स्वच्छ आणि शुद्ध पाणी देण्यासाठी ‘जार’ची निवड केली. आधी ५ ते ६ जार लागत होते. आता १५ ते २० जारही पुरत नाहीत. नगर-मनमाड रोडवर जाणाऱ्या अनेकांना पाण्याची गरज भासते. शिवाय हॉटेलसमोर पाच-सहा झाडे असल्याने त्याखालीच जार ठेवण्यात आले आहेत. शुद्धतेबरोबरच थंड पाणी मिळत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. उद्योगमित्रांनी एकत्र येऊन हा पाणपोईचा उपक्रम सुरू केला आहे. असेच पाणपोईचे जार तरुणांनी शहरात इतर ठिकाणी उपलब्ध करून द्यावेत. -राहुल मिणियार, हॉटेल उद्योजक, मनमाडरोड
नगर कॉलेजच्या कॉर्नरला पाणपोई सुरू केली आहे. या पाणपोईमध्ये रोज चार ते पाच जार ठेवले जातात. ‘जार’ची संख्या आणखी वाढविण्यात येणार आहे. पाणपोईमध्ये रांजणाऐवजी जार ठेवण्याचा उपक्रम गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे. पाणपोईचे स्वरुप पहिल्यांदा आम्हीच बदलले आहे. नगर कॉलेज परिसरात प्रवाशी, रिक्षावाले आणि विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असते. त्यांच्यासाठी या पाणपोईचा मोठा उपयोग होतो आहे. तरुणांनी एकत्र येऊन हा उपक्रम सुरू केला आहे.
-साहेबान जहागीरदार, अध्यक्ष, अहमदनगर यूथ फोरम.

Web Title: The deserted exile, ginger-packaged water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.